Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीर येथे १८ मार्च रोजी शेतकरी प्रबोधन कार्यशाळा




यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व कृ. बा. समितीचा संयुक्त उपक्रम; कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

मंगरुळपीर :
शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, तण नियंत्रण तसेच शेतीसमोरील विविध आव्हानांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी “शेतकरी प्रबोधन कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सांस्कृतिक सभागृह, वाशीम रोड, मंगरुळपीर येथे पार पडणार आहे.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत कार्यरत डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र, अमरावती यांच्या सहकार्याने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. बदलत्या हवामान परिस्थितीमुळे शेतीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत असताना शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती, आधुनिक तंत्रज्ञान आणि पीक व्यवस्थापनाच्या नव्या पद्धतींचे मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. सुभाषरावजी ठाकरे (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) हे राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. महेंद्र ढोरे (प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच मा. श्री. चंद्रकांतदादा ठाकरे (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशीम तथा सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरुळपीर) आणि मा. श्री. राम ठाकरे (सदस्य, कार्यकारी परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यशाळेत कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ शेतकऱ्यांना विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. मा. श्री. आरिफ शाह (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम) हे कृषी विभागाच्या विविध शासकीय योजना, त्यासाठी आवश्यक असलेली पात्रता तसेच शेतकऱ्यांनी त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय मा. श्री. सुधीर जगताप (प्रगती अ‍ॅग्रो एंटरप्रायजेस, अमरावती) हे “शेतीसमोरील सध्याची आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील तज्ज्ञ प्राध्यापक देखील या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. योगेश इंगळे हे “संत्रा पिकाविषयी आधुनिक व्यवस्थापन व उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञान” या विषयावर माहिती देणार आहेत. डॉ. व्ही. व्ही. गौड हे “तण नियंत्रण व तण व्यवस्थापन” या विषयावर शास्त्रीय माहिती देणार असून डॉ. विजयकुमार गावंडे हे “तूर पिकाचे आधुनिक व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना” याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, माती व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, तसेच उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती व्यवसायात अधिक प्रगती साधण्यास आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

याशिवाय या कार्यशाळेत शेतकऱ्यांना तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार असून शेतीतील विविध समस्या व अडचणींबाबत चर्चा करून त्यावर मार्गदर्शनही मिळणार आहे. त्यामुळे ही कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या कार्यशाळेला परिसरातील सर्व शेतकरी, कृषी क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. महेंद्र मेटे (संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र, अमरावती), डॉ. राहुल सुर्वे (प्राचार्य, यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर) आणि श्री. गणेश शर्मा (सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरुळपीर) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments