Ticker

6/recent/ticker-posts

तिन वर्षांपासून रात्रंदिवस स्ट्रीट लाईट सुरू; शहापूर–सोनखास प्रकरणात वीजेचा मोठा अपव्यय

तीन वर्षांपासून रात्रंदिवस स्ट्रीट लाईट सुरू!

शहापूर–सोनखास परिसरात वीजेचा कोट्यवधींचा अपव्यय; प्रशासन झोपेत?

ग्रामपंचायतीच्या पत्रालाही प्रतिसाद नाही; जबाबदारी कोण घेणार?

मंरुळपीर : सुधाकर चौधरी

शहर हद्दीतील शहापूर–सोनखास परिसरात तब्बल तीन वर्षांपासून स्ट्रीट लाईट रात्रंदिवस सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या निष्काळजीपणामुळे लाखो रुपयांची वीज अक्षरशः जळून खाक होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जवळपास ५ हजार लोकवस्ती असलेल्या या परिसरात ८०० ते १००० लाईट दिवसाढवळ्या सुरू असल्याने वीजेचा मोठा अपव्यय होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संदर्भात जांब–सोनखास–शहापूर ग्रामपंचायतीने सचिव व सरपंच यांच्या सहीने दि. १८ एप्रिल २०२४ रोजी Maharashtra State Electricity Distribution Company Limitedच्या मंरुळपीर कार्यालयाला लेखी निवेदन देऊन तांत्रिक बिघाड आणि लोबकळलेल्या तारा दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र तब्बल दोन वर्षे उलटूनही संबंधित विभागाने या पत्राची दखल घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबाबत संतापाची लाट उसळली आहे.

स्थानिकांच्या मते, या भागात असलेल्या शेकडो विद्युत खांबांवरील बल्ब दिवसभर सुरू असल्यामुळे दररोज सुमारे १५० ते २०० युनिट वीज वाया जाते. महिन्याला सुमारे ४ ते ६ हजार युनिट वीज केवळ दिवसाच्या वेळीच जळून जाते, ज्याचे बिल ७५ हजार रुपयांच्या घरात जाते. गेल्या तीन वर्षांचा हिशोब केला तर ३० ते ५० लाख रुपयांची वीज अक्षरशः जाळली गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेत मावळा संघटनेचे उपाध्यक्ष राहुलदेव मनवर यांनी ग्रामपंचायतीची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी Maharashtra State Electricity Distribution Company Limitedचे सहाय्यक अभियंता एस. एस. जयपुरकर यांची भेट घेऊन हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्यांच्या घरातील मीटरमध्ये किरकोळ फॉल्ट आढळला किंवा बिल थकले तर वीज वितरण कंपनी धाडसत्र राबवून काही युनिटसाठीही मोठे दंड आकारते. मग तीन वर्षांपासून रात्रंदिवस सुरू असलेल्या शेकडो स्ट्रीट लाईटमुळे झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीसाठी संबंधित विभागावर कारवाई का होत नाही? जबाबदार अधिकाऱ्यांना जाब का विचारला जात नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

देशाच्या संपत्तीचा असा उघडपणे होणारा अपव्यय थांबविण्यासाठी तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा या प्रकरणावर व्यापक आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहणार, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments