स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांची सदिच्छा भेट; शहरातील पथविक्रेत्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले
प्रतिनिधी : श्रावणी कामत | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पथविक्रेता समितीचे सदस्य किसन उर्फ माऊली भोसले यांनी नुकतीच स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांची सदिच्छा भेट घेतली. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना भोसले यांनी शहरातील पथविक्रेत्यांवर होत असलेल्या अन्यायकारक अतिक्रमण कारवाईचा मुद्दा ठामपणे उपस्थित केला.
भोसले यांनी सांगितले की, शहरातील विविध भागांमध्ये पथविक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण कारवाई केली जात असून त्यामुळे हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. पथविक्रेत्यांना कायद्याचे संरक्षण असतानाही वारंवार कारवाईच्या नावाखाली त्रास दिला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी शहरात खाजगी ठेकेदारांमार्फत करण्यात आलेल्या कथित बोगस सर्वेक्षणाबाबतही भोसले यांनी आक्षेप नोंदवला. या सर्वेक्षणामुळे अनेक पात्र पथविक्रेते योजनेपासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरातील विविध भागांमध्ये हॉकर्स झोन निर्माण करण्याच्या प्रक्रियेत पथविक्रेता समितीचे अध्यक्ष व सदस्य, तसेच महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक असून समितीच्या मताला प्राधान्य दिले गेले पाहिजे, अशी ठाम भूमिका भोसले यांनी यावेळी मांडली.
या प्रसंगी किसन उर्फ माऊली भोसले यांनी पारंपरिक पुष्पगुच्छ देण्याऐवजी “मनोहरी विचार” हे पुस्तक भेट देत अभिषेक बारणे यांचा सन्मान केला. या भेटीत शहरातील पथविक्रेत्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
0 Comments