मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) : अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री जयराजजी कोरपे व उपाध्यक्षपदी रामभाऊ सुभाषरावजी ठाकरे यांची निवड होताच मंगरूळपीर शहरात जल्लोषाचा अक्षरशः स्फोट झाला. या निवडीने सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत असून, शहरातील नागरिकांनी गुलाल उधळत, फटाक्यांच्या आतिषबाजीसह आनंदोत्सव साजरा केला.
शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. “साहेब” आणि “दादा” यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत संपूर्ण शहर दणाणून सोडले. ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या रंगात न्हाऊन निघालेल्या वातावरणात मंगरूळपीर शहर सणासारखे उजळून निघाले. मिठाईचे वाटप करून आनंद द्विगुणित करण्यात आला.
या नियुक्तीमुळे सहकार क्षेत्राला सक्षम व अभ्यासू नेतृत्व लाभल्याची भावना व्यक्त होत असून, कोरपे व ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या कामकाजात वेग आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
दरम्यान, या निवडीमागे जिल्ह्यातील ज्येष्ठ व प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. जिल्ह्यातील सहकार, राजकारण व सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ प्रभावी भूमिका बजावणारे सुभाषराव ठाकरे हे नेतृत्व म्हणजे अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान मानले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण नेतृत्व घडले असून, जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने भरीव योगदान दिले आहे.
सुभाषराव ठाकरे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच सहकार क्षेत्रात नवे बदल घडून येत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वावर असलेला जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा याचाच प्रत्यय या नियुक्तीनंतर झालेल्या उत्स्फूर्त जल्लोषातून आल्याचे दिसून आले.
एकूणच, कोरपे-ठाकरे यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रात नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे असून, मंगरूळपीर शहरातील जल्लोषाने या निर्णयाला लोकमान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 Comments