“मंगरूळपीरमध्ये मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट रोखला; १९ वर्षीय आरोपी जेरबंद, दोन दुचाकी जप्त”
मंगरूळपीर (सुधाकर चौधरी) : शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, मंगरूळपीर पोलिसांनी तत्पर कारवाई करत १९ वर्षीय तरुणास अटक करून दोन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०१ एप्रिल २०२६ रोजी विनोद तुळशीराम जाधव यांची हिरो होंडा फॅशन प्रो काळ्या रंगाची (क्र. एमएच ३० ए आर १७८७, किंमत अंदाजे ३० हजार रुपये) ही दुचाकी जांबरोड परिसरातून चोरीला गेली होती. त्यानंतर दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी अश्विन शिवचंद चव्हाण यांची त्याच कंपनीची काळ्या रंगाची (क्र. एमएच ३७ क्यू ६३७४, किंमत अंदाजे ३० हजार रुपये) दुचाकी बसस्थानक परिसरातून चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दोन्ही घटनांवरून मंगरूळपीर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शोध पथकाकडे सोपविण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली. तसेच गोपनीय माहितीदारांच्या मदतीने संशयिताचा शोध घेण्यात आला. संशयावरून ताब्यात घेतलेल्या इसमाची कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी शुभम पुंडलिक मनवर (वय १९, रा. निंबी, ता. मंगरूळपीर) यास अटक करून त्याच्याकडून दोन्ही चोरीच्या दुचाकी मेमोरँडम पंचनाम्याद्वारे जप्त केल्या आहेत. आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षिरसागर व पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सपोनि गणेश काळे, पोहवा संजय घाटोळे, पोशि प्रमोद वानखडे, रफिक मांजरे, प्रविण माळकर, गजानन ब्राह्मण, मनीष आडे तसेच चालक आशिष रघुवंशी यांनी सहभाग घेतला.
मंगरूळपीर पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
0 Comments