Ticker

6/recent/ticker-posts

कलियुगाचे आरसे – माणुसकी हरवलेली वाटचाल लेखक : सुधाकर चौधरी


आजचा माणूस विज्ञान, तंत्रज्ञान, पैसा आणि प्रतिष्ठेच्या शिखरावर पोहोचला आहे; पण या उंचीवर चढताना त्याने आपल्या मनातील माणुसकी मात्र कुठेतरी हरवून बसला आहे. बाहेरून तेजस्वी आणि यशस्वी दिसणारा हा माणूस आतून मात्र संवेदनाशून्य होत चालला आहे—हेच कलियुगाचे सर्वात मोठे सत्य आहे.

एखाद्या मृतदेहाला हात लावला की आपण घरी येऊन आंघोळ करतो , अश्रू ढाळतो, दुःख व्यक्त करतो. पण हाच माणूस जिवंत, बेजुबान प्राण्याला निर्दयपणे मारून खातो, तेव्हा त्याला काहीच वाटत नाही. ही कोणती करुणा? ही कोणती मानवता? ही दुटप्पी वृत्तीच आजच्या समाजाचं खरं प्रतिबिंब आहे.

आपण जेवताना अन्नात एखादा केस दिसला, तर ते अन्न लगेच दूर सारतो. कारण ते “अशुद्ध” वाटतं. पण अंड खाताना किंवा मांसाहार करताना त्यामागे एका जीवाचं अस्तित्व आहे, याचा आपण विचारच करत नाही. आपल्या सोयीप्रमाणे आपण शुद्ध-अशुद्ध, योग्य-अयोग्य ठरवतो—हीच आपल्या विचारांची मर्यादा आहे.

धार्मिकतेच्या नावाखाली आज माणूस मंदिरांच्या पायऱ्या झिजवतो. रोज देवासमोर नतमस्तक होतो, पण मन मात्र कठोरच राहतं. एक दगड मंदिरात जाऊन “देव” बनतो, कारण त्यात श्रद्धा असते; पण माणूस रोज मंदिरात जाऊनही “दगड” होतो, कारण त्याच्यात भावना उरलेल्या नसतात. देवाकडे जाणं म्हणजे केवळ दर्शन नव्हे, तर स्वतःमध्ये बदल घडवण्याचा एक प्रयत्न असायला हवा—पण तोच हेतू अनेकदा हरवलेला दिसतो.

आई… या शब्दातच संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. ती आपल्या लेकरासाठी स्वतःचं सौंदर्य, आयुष्य, स्वप्नं—सगळं काही अर्पण करते. तिच्या त्यागाला मोल नाही. पण आजचा मुलगा आपल्या पत्नीच्या मोहात आईला विसरतो, तिला दूर सारतो. जिच्या कुशीत तो वाढला, तिलाच एकटं सोडतो—यापेक्षा मोठं पाप कोणतं?

जीवनात आपण प्रत्येक क्षेत्रात जिंकतो—पैसा कमावतो, नाव कमावतो, लोकांची मने जिंकतो. पण देवासमोर मात्र आपण हार मानतो. म्हणूनच फुलांच्या दुकानात जाऊन “एक हार द्या” असं म्हणतो. त्या हारात फुलं नसतात, तर आपल्या अहंकाराचा पराभव असतो. देवापुढे नतमस्तक होताना आपण आपल्या मर्यादा मान्य करतो—हीच खरी जाणीव आहे.

कलियुग म्हणजे केवळ काळ नाही, तर विचारांची अवस्था आहे. जिथे स्वार्थ माणुसकीवर मात करतो, जिथे भावना दिखाव्यात हरवतात, आणि जिथे नाती स्वार्थासाठी तुटतात—तेच कलियुग.

पण अजूनही उशीर झालेला नाही. जर प्रत्येकाने स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहिलं, आपल्या कृतींचा विचार केला, तर बदल शक्य आहे. माणूस म्हणून जगायचं असेल, तर करुणा, प्रेम, आदर आणि कृतज्ञता या मूल्यांना पुन्हा जागं करावं लागेल.

  कारण आपण रोज मंदिरात गेलोच पाहिजे, पण त्या जाण्यामागचा खरा अर्थ समजून घेतला, तरच त्याला खरी किंमत मिळते. मंदिरात जाणं म्हणजे केवळ देवाला नमस्कार करणं नाही, तर स्वतःच्या मनाला शांत करण्याचा, विचारांना दिशा देण्याचा आणि आयुष्यातील गोंधळातून काही क्षण बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. तिथे गेल्यावर मनाला एक वेगळं समाधान मिळतं—अहंकार कमी होतो, चुकांची जाणीव होते, आणि स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची ताकद मिळते. जसं एखाद्या हॉटेलमध्ये फक्त बसून राहिल्याने भूक भागत नाही, तसंच मंदिरात जाण्याचा हेतू न समजून घेतल्यास त्याचा उपयोग होत नाही. मंदिर आपल्याला शिकवतं—नम्रता, संयम, कृतज्ञता आणि श्रद्धा. आणि जेव्हा माणूस या गोष्टी मनापासून स्वीकारतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील रिकामेपणा हळूहळू भरून निघतो… मन शांत होतं, आणि डोळ्यांत नकळत पाणी येतं—कारण त्या क्षणी त्याला स्वतःचा खरा चेहरा दिसतो.आणि ज्या दिवशी माणूस आपल्या वागण्यात, विचारांत आणि कृतीतून खऱ्या अर्थाने बदल घडवेल, त्या दिवशीच या कलियुगातही सत्यम, शिवम, सुंदरम यांचा खरा अर्थ उजळून निघेल. राम कृष्ण हरी जय गजानन

Post a Comment

0 Comments