Ticker

6/recent/ticker-posts

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियानाचा वाशी तर्फे देवरूख येथे भव्य शुभारंभ




देवरूख : प्राथमिक आरोग्य केंद्र धामापूर अंतर्गत वाशी तर्फे देवरूख येथे महाराष्ट्र शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्वाकांक्षी अभियानाचा ग्रामसभेद्वारे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. “आरोग्यदायी अभियानाकरिता ग्रामसभा” या उपक्रमांतर्गत गावकऱ्यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत प्रशासक सौ. निकिता कंरडे, ग्रामविकास अधिकारी रविंद्र लोटणकर, उपसरपंच सुनिल सावंत, माजी सरपंच विष्णू सावंत, अनुष्का सावंत, गणपत सावंत, महेंद्र कांबळे, लक्ष्मी सावंत, सी.आ. पी. सुर्वे मॅडम, मनिषा कांबळे, सायली सावंत, महिला बचत गटांच्या अध्यक्ष व सदस्य, शाळेतील शिक्षकवृंद, आरोग्य सेविका पी. एस. इंगळे, आरोग्य सेवक विजय राऊत, प्रभारी सामुदायिक आरोग्य अधिकारी प्रसाद व्हालकर, आशासेविका मनिषा सावंत, समाजसेवक दिलीप कडू, अंगणवाडी सेविका सुप्रिया सावंत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ग्रामविकास अधिकारी रविंद्र लोटणकर, प्रभारी सामुदायिक आरोग्य अधिकारी प्रसाद व्हालकर व उपसरपंच सुनिल सावंत यांनी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्यविषयक जनजागृती करत मार्गदर्शन केले. लोकसहभाग, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि शासन यांच्यातील समन्वयातून हे अभियान यशस्वी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मान्यवरांनी तसेच ग्रामस्थ व महिला बचत गटांच्या सदस्यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसभा व समिती स्थापन करून या अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

हे अभियान १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार असून जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे, डॉ. व्ही. आर. रायभोळे, डॉ. भक्ती वाजे, डॉ. श्वेता पवार तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशासेविका, बचत गट सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, विविध मंडळे, युवक, वारकरी संप्रदाय, विद्यार्थी व पत्रकार यांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन गाव आरोग्यसंपन्न करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन वाशी तर्फे देवरूख आयुष्यमान आरोग्य मंदिर व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments