प्रेम… जे शब्दांच्या पलीकडचं असतं
✍️ लेखक : सुधाकर चौधरी
**“देव होता कृष्ण तरी, प्रेमामध्ये पडलाच ना....
नशिबी होती रुक्मिणी, तरी राधेसाठी झुरलाच ना...!
गोपीकांचा कृष्ण सखे, राधेसाठी रडलाच ना...
नशिबालाच रचवणारा, नशिबापुढे हरलाच ना...!
तूच सांग ना मी तर साधारण मनुष्य आहे,
तू मला आणि मी तुला कधी समजणार…
हा प्रश्न प्रत्येकाला पडलाच ना..!”**
प्रेम… हा शब्द जितका छोटा आहे, तितकाच तो विशाल आहे. प्रेमाला सीमा नसते, नियम नसतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाला कोणतंही बंधन नसतं. प्रेम फक्त जाणवतं… मनाच्या खोल कप्प्यात जाऊन कायमचं घर करून राहतं.
जगाला प्रेमाचं, नात्यांचं आणि जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवणारा श्रीकृष्ण सुद्धा प्रेमापासून दूर राहू शकला नाही. कारण प्रेम ही अशी भावना आहे, जी देवाला सुद्धा माणूस बनवते. रुक्मिणी त्याची पत्नी होती, संसार तिच्यासोबत होता, पण त्याच्या हृदयात राधा कायम जिवंत होती.
आणि इथेच प्रेमाचं खरं सौंदर्य दिसून येतं.
“बायको असो का प्रेयसी…
प्रेम दोघींवरही तेवढंच करावं,
जसं कृष्णाने राधेवर आणि रुक्मिणीवर केलं…!”
कृष्णाने कधी राधेच्या प्रेमाला कमी लेखलं नाही आणि रुक्मिणीच्या नात्यालाही कमी होऊ दिलं नाही. कारण त्याच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नव्हतं… तर जपणं होतं.
राधा त्याच्या आत्म्याची ओढ होती… तर रुक्मिणी त्याच्या आयुष्याची साथ होती.
एकीकडे भावना होत्या… तर दुसरीकडे समर्पण होतं… आणि कृष्णाने दोघींनाही मनापासून स्वीकारलं.
आजच्या काळात लोक प्रेमात तुलना करतात.
“कोण जास्त प्रेम करतं?”
“कोण महत्त्वाचं?”
“कोण आपलं?”
पण खरं प्रेम कधी तुलना करत नाही.
खरं प्रेम हे व्यक्तीच्या स्थानावर नाही, तर भावनेच्या खोलीवर ठरतं.
राधा आणि कृष्णाचं प्रेम हे जगातील सर्वात सुंदर अपूर्ण प्रेम मानलं जातं. कारण ते प्रेम नात्याच्या चौकटीत बंद नव्हतं. त्यात अधिकार नव्हता, पण अपार जिव्हाळा होता. त्यात स्वार्थ नव्हता, पण अमर समर्पण होतं.
आज प्रत्येक प्रियकराच्या मनात एक राधा असते…
आणि प्रत्येक संसारात एक रुक्मिणी असते…
पण दोघींना समजून घेण्याची ताकद प्रत्येकामध्ये नसते.
प्रेमात सर्वात महत्त्वाचं असतं ते “समजून घेणं.”
समोरची व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती काय अनुभवते हे जाणणं म्हणजे प्रेम.
कधी न बोलता डोळ्यांमधलं दुःख ओळखणं…
रागामागची काळजी समजून घेणं…
दूर असूनही जवळ असल्याची जाणीव करून देणं…
हेच खरं प्रेम असतं.
आजच्या जगात प्रेम खूप सहज होतं आणि तितक्याच सहज संपतंही.
लोक वेळेनुसार बदलतात… भावना बदलतात… नाती बदलतात…
पण खरं प्रेम कधी बदलत नाही.
कृष्णाने राधेला कधी मिळवलं नाही, पण तिच्यावर प्रेम करणं कधी थांबवलं नाही.
आणि रुक्मिणीसोबत संसार करताना तिचा आदरही कमी होऊ दिला नाही.
कारण प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नसतं…
प्रेम म्हणजे जबाबदारी, आदर आणि समर्पण असतं.
काही लोक आपल्या आयुष्यात कायमचे नसतात, पण त्यांच्या आठवणी कायम आपल्या श्वासात राहतात.
काही नाती अपूर्ण राहतात, पण त्यांची भावना आयुष्यभर पूर्ण वाटत राहते.
म्हणूनच कधी कधी वाटतं…
कृष्ण देव असूनही प्रेमात हरला…
तर आपण तर साधे माणसं आहोत.
आपल्यालाही कोणीतरी समजून घ्यावं…
आपल्या मनातलं न बोलता ओळखावं…
आपल्या दुःखात साथ द्यावी…
ही अपेक्षा चुकीची नाही.
कारण प्रत्येक माणूस बाहेरून कितीही कठोर असला तरी मनातून त्यालाही प्रेम हवं असतं.
कोणीतरी “आपलं” म्हणणारं हवं असतं.
आज अनेक प्रेमकथा अपूर्ण राहतात.
काहींना समाज वेगळं करतो…
काहींना परिस्थिती…
तर काहींना नशिब…
पण खरं प्रेम कधी मरत नाही.
ते आठवण बनून जगत राहतं.
कधी एखाद्या गाण्यात भेटतं…
कधी जुन्या फोटोमध्ये दिसतं…
तर कधी शांत रात्री डोळ्यांत पाणी आणतं.
आणि तेव्हाच मन हळूच विचारतं…
“तू मला आणि मी तुला कधी समजणार…?”
हा प्रश्न प्रत्येक प्रेम करणाऱ्या मनाला पडतो.
कारण प्रेम समजण्यासाठी शब्द लागत नाहीत…
प्रेम समजण्यासाठी फक्त मन लागतं.
शेवटी एकच सांगावंसं वाटतं —
प्रेम करा… पण कृष्णासारखं करा…
जिथे भावना असतील… आदर असेल… निस्वार्थ समर्पण असेल…
आणि कोणाचंही मन न दुखावता प्रेम जपण्याची ताकद असेल.
कारण खरं प्रेम मिळणं नशिबाची गोष्ट असते…
आणि ते आयुष्यभर जपणं हीच खरी परीक्षा असते.
✍️ लेखक : सुधाकर चौधरी
0 Comments