मंगरूळपीर शहरातील वरूड रोड परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात भक्ती, अध्यात्म, विनोद आणि समाजप्रबोधनाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे. हरिनामाच्या अखंड गजराने भारलेला परिसर, टाळ-मृदुंगाचा निनाद, अभंगवाणीचा मधुर स्वर आणि संत परंपरेच्या विचारांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे.
या भव्य धार्मिक सोहळ्यात ह.भ.प. गुरुवर्य नामदेव काकडे महाराज आपल्या अमृतमयी वाणीतून श्रीमद भागवत कथेचे रसाळ निरूपण करीत असून भागवत धर्म, भक्ती, सदाचार आणि मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या प्रभावी दृष्टांतांनी आणि संतवाङ्मयाच्या आधाराने कथा श्रवणासाठी आलेले भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध होत आहेत.
दिनांक २५ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या हरिभक्तिपरायण विनोदाचार्य ह.भ.प. रमेश महाराज दुधे यांच्या प्रभावी कीर्तन सेवेत “कीर्तन म्हणजे परिवर्तन” या वाक्याचा प्रत्यय प्रत्येक श्रोत्याला आला. कीर्तन हे केवळ मनोरंजन नसून समाजमन घडविणारे, संस्कार रुजविणारे आणि आत्मपरीक्षण घडविणारे प्रभावी माध्यम आहे, हे महाराजांनी आपल्या ओघवत्या वाणीने पटवून दिले.
आपल्या खास विनोदी शैलीत महाराजांनी उपस्थितांना खतखदून हसवत जीवनाचे गूढ आणि अध्यात्माचे सार साध्या-सोप्या भाषेत समजावून सांगितले. “देव सुंदर का आहे?” या विषयावर विवेचन करताना त्यांनी सांगितले की परमेश्वराचे सौंदर्य त्याच्या निर्मळ भावनेत, करुणेत आणि भक्तांवरील प्रेमात आहे. “माणसाने सुंदर विचार, सुंदर वर्तन आणि सुंदर मन ठेवले तर त्याचे जीवनही देवासारखे तेजस्वी होईल,” असा संदेश त्यांनी दिला.
कीर्तनात त्यांनी मानवी शरीराचा सुंदर दृष्टांत देत समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. “डोळे, हात, पाय, हृदय हे सर्व अवयव एकमताने काम करतात; मग माणूस मात्र एकमेकांविरुद्ध वाकडे का चालतो?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी मतभेद, अहंकार आणि द्वेष यांवर प्रखर भाष्य केले. “घरातील चूल, भांडे, पाणी आणि ज्वाला एकत्र आल्याशिवाय अन्न शिजत नाही; त्याचप्रमाणे संसारात प्रेम, संयम आणि समजूत नसेल तर समाधान मिळत नाही,” हा दृष्टांत उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.
कीर्तनामध्ये नातेसंबंधांवरील मार्मिक विनोदांनी वातावरणात हास्याची उधळण केली. “भावासाठी प्रेम, देवासाठी श्रद्धा आणि नात्यांसाठी संयम आवश्यक आहे,” असे सांगत महाराजांनी कुटुंबव्यवस्थेतील गोडवा जपण्याचा संदेश दिला. विनोद आणि अध्यात्म यांचा सुंदर मेळ घालत त्यांनी समाजातील विस्कटलेली नाती प्रेमाने जोडण्याचा प्रयत्न केला.
माय-माऊलीच्या त्यागाचे वर्णन करताना महाराजांच्या वाणीला भावनिक स्पर्श लाभला. “आई स्वतः उपाशी राहते पण लेकरांना पोटभर जेवू घालते; म्हणूनच देवापेक्षाही आई मोठी वाटते,” हा दृष्टांत ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. प्रपंच आणि परमार्थ यांचा सुंदर समतोल राखणारी माय-माऊली हीच घराची खरी शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
कीर्तनातील सर्वात भावपूर्ण क्षण म्हणजे पंढरीनाथ विठ्ठल यांच्या विटेवरील प्रतिमेचे केलेले विवेचन. “विठ्ठल विटेवरच का उभा आहे? दोन्ही हात कमरेवर का आहेत?” या प्रश्नांवर बोलताना महाराज म्हणाले, “भक्त पुंडलिकाच्या सेवेसाठी देव विटेवर थांबला. देव भक्तासाठी थांबू शकतो, पण भक्ती थांबू नये. कमरेवर हात ठेवून विठ्ठल जणू माणसाला सांगतो आहे — ‘अरे माणसा, संसाराच्या धावपळीत किती अडकणार? आता भक्तीच्या मार्गालाही वेळ दे!’”
या सप्ताहात विणेच्या मधुर सुरांनी भक्तिमय वातावरण अधिक प्रसन्न करणारे ह.भ.प. आनंदराव महाराज चौगुले यांची सेवा विशेष भावस्पर्शी ठरत आहे. त्यांच्या विणेच्या निनादामुळे वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा जिवंत झाल्याची अनुभूती भक्तांना येत आहे.
कीर्तन परंपरेला सुरेल साज चढविणारे ह.भ.प. गणेश महाराज बुरे, ह.भ.प. भारत महाराज बुरे, ह.भ.प. रामेश्वर महाराज बुरे तसेच ह.भ.प. लक्ष्मण महाराज भोईनवाड यांनी अभंग, गवळणी आणि हरिपाठातून वातावरण भक्तिमय केले. तर मृदुंगाचार्य ह.भ.प. अविनाश महाराज बुरे यांनी आपल्या प्रभावी वादनातून संपूर्ण सोहळ्याला विशेष रंगत आणली.
या कीर्तन सेवेतून “कीर्तन म्हणजे केवळ टाळ-मृदुंगाचा गजर नाही; तर समाजमनाला योग्य दिशा देणारे संस्कारांचे विद्यापीठ आहे,” हा संदेश प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचला. कीर्तनाच्या माध्यमातून भक्ती, नैतिकता, सदाचार, प्रेम, माणुसकी आणि समाजप्रबोधनाची भाषा साध्या शब्दांत समजावून सांगण्याची ताकद पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.
या अविस्मरणीय कीर्तन सोहळ्यामुळे उपस्थितांना केवळ मनोरंजन नव्हे तर अध्यात्म, संस्कार, भक्ती आणि जीवनमूल्यांचा अमूल्य ठेवा लाभला.
0 Comments