Ticker

6/recent/ticker-posts

कोट्यवधींच्या जलयोजना ठरल्या कागदावरच; पाण्याच्या एका थेंबासाठी पेडगावकरांची २० वर्षांची प्रतीक्षा


प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात ६ जूनपासून आमरण उपोषणाचा एल्गार

किशोर देशमुख | मंगरूळपीर

मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव येथे शासनाच्या जलजीवन मिशनसह विविध पाणीपुरवठा योजनांवर लाखो रुपयांचा निधी खर्च झाला, पाण्याची टाकी उभी राहिली, गावभर पाईपलाईनचे जाळे पसरले; मात्र आजही ग्रामस्थांच्या नशिबी पाण्याचा एक थेंबही आला नसल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तब्बल १५ ते २० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पेडगावकरांनी अखेर प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून ६ जूनपासून गावातील पाण्याच्या टाकीवर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलजीवन मिशन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध योजना राबविण्यात आल्या. कागदोपत्री विकासाची मोठी आकडेवारी मांडली गेली, मात्र प्रत्यक्षात ग्रामस्थांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टाकी उभी, पाईपलाईन तयार; मग पाणी गेले कुठे?

गावात उभारलेली पाण्याची टाकी आजही पेडगावकरांच्या आशांचा केवळ मूक साक्षीदार बनून उभी आहे. लाखो रुपयांचा खर्च करून टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमधून पाणी वाहण्याऐवजी ग्रामस्थांच्या डोळ्यातील अश्रूच वाहत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पाणी नाहीच, उलट रस्त्यांचीही दुर्दशा

पाईपलाईनच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय बनल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पाणीपुरवठा योजनांचा लाभ तर मिळालाच नाही, उलट रस्त्यांचीदेखील वाट लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

निवेदनांचा ढीग, कारवाई मात्र शून्य

ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे निवेदने देऊन प्रश्न मांडला. मात्र प्रत्येक वेळी आश्वासनांचे गाजर दाखविले गेले, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

६ जूनपासून पाण्याच्या टाकीवरच आमरण उपोषण

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने ६ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून गावातील पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. हे आंदोलन पूर्णतः शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या मागण्या

  • सर्व पाणीपुरवठा योजनांची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी.
  • गैरव्यवहार, भ्रष्टाचार व हलगर्जीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई.
  • तात्काळ नियमित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.
  • खराब झालेल्या सर्व रस्त्यांची त्वरित दुरुस्ती.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा.

"आता पाणी द्या, अन्यथा उत्तर द्या"

उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना, जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांची राहील, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही गाव आजही तहानलेले आहे. त्यामुळे पेडगावचा पाणीप्रश्न हा केवळ एका गावाचा प्रश्न नसून शासनाच्या जलव्यवस्थापनाच्या दाव्यांवर उभे राहिलेले मोठे प्रश्नचिन्ह बनला आहे.


Post a Comment

0 Comments