Ticker

6/recent/ticker-posts

मसोला बु येथे श्री नवनाथ महाराज मूर्ती व मंदिर कलश स्थापना सोहळा उत्साहात


आमदार श्यामभाऊ खोडे व सौ. उषाताई खोडे यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा; भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन

मंगरूळपीर (ता. प्र.) : तालुक्यातील धार्मिक श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या मसोला बु. येथील श्री नवनाथ महाराज संस्थानमध्ये नव्याने स्थापित करण्यात आलेल्या श्री नवनाथ महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच मंदिर कलश स्थापना कार्यक्रम बुधवार, दि. १७ जून रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या धार्मिक सोहळ्याची सुरुवात मंगळवार, दि. १६ जून रोजी विविध धार्मिक विधींनी करण्यात आली. यामध्ये श्री गणपती पूजन, कलश पूजन, मंदिर पूजन आदी विधी पार पडले. सायंकाळी भजन, कीर्तन व महाआरतीने भाविकांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती मिळाली.

बुधवार, दि. १७ जून रोजी सकाळी ७ वाजता मंदिर कलश स्थापना करण्यात येणार असून सकाळी ९ वाजता आमदार श्यामभाऊ खोडे व सौ. उषाताई श्यामभाऊ खोडे यांच्या शुभहस्ते श्री नवनाथ महाराजांच्या नव्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांमध्ये विशेष उत्सुकता पाहावयास मिळत आहे.

मसोला बु. येथील श्री नवनाथ महाराज संस्थान हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी येथे नवनाथ महाराज बीज सोहळा, हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना हजारो भाविक उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेत असतात. यावर्षी आयोजित करण्यात आलेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना सोहळा हा संस्थानच्या इतिहासातील विशेष सोहळा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दुपारी १ वाजता सर्व भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या धार्मिक व ऐतिहासिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री नवनाथ महाराज संस्थान, मसोला बु. यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments