वाशिम | विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता तरुणांनी राजकारणात यावे की नाही, हा प्रश्न आता केवळ चर्चेचा विषय राहिलेला नसून चिंतेचा विषय बनला आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले प्रशांत चौधरी यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त करत राजकीय व्यवस्थेलाच थेट प्रश्न विचारला आहे.
"जनतेच्या प्रश्नांवर लढणारे कार्यकर्ते दुर्लक्षित आणि सत्तेसाठी पक्षांतर करणारे नेते सन्मानित होत असतील, तर तरुणांनी कोणत्या आदर्शातून राजकारणात यावे?" असा संतप्त सवाल प्रशांत चौधरी यांनी उपस्थित केला.
राज्यातील शेतकरी हमीभाव, कर्जमाफी, बेरोजगारी, शिक्षण आणि विकासाच्या प्रश्नांवर संघर्ष करत असताना अनेक नेते केवळ सत्तेच्या गणितासाठी पक्ष बदलत असल्याचे चित्र दिसत आहे. विचारधारा, निष्ठा आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांना तिलांजली देत सुरू असलेल्या या राजकारणामुळे तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
"निष्ठा ही बाजारात विकत मिळत नाही. ती रक्तात असावी लागते. आज अनेक जण राजकारणाला सेवा नव्हे तर व्यवसाय समजू लागले आहेत. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे," असे चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
२०१५ पासून सातत्याने राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रशांत चौधरी यांनी गेल्या अकरा वर्षांतील अनुभव सांगताना म्हटले की, राजकारणात संघर्ष करणाऱ्यांपेक्षा संधी साधणाऱ्यांना अधिक महत्त्व मिळत असल्याचे वास्तव वेदनादायी आहे. "जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल, तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे," असेही ते म्हणाले.
राजकीय पक्षांतराच्या वाढत्या प्रवृत्तीवर टीका करताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, "कालपर्यंत ज्या विचारधारेविरोधात बोलत होते, त्याच विचारधारेसोबत आज सत्तेसाठी जाणाऱ्यांवर जनता किती विश्वास ठेवणार?"
मात्र या सर्व परिस्थितीतही तरुणांनी राजकारणापासून दूर जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. "राजकारण सोडून देणे हा पर्याय नाही. स्वच्छ विचार, प्रामाणिक भूमिका, जनसेवेची तळमळ आणि निष्ठा यांच्या बळावर तरुणांनी पुढे यायला हवे. अन्यथा स्वार्थी राजकारणाला अधिक खतपाणी मिळेल," असा इशाराही त्यांनी दिला.
प्रशांत चौधरी यांनी व्यक्त केलेल्या भावना आज अनेक सामान्य नागरिक, प्रामाणिक कार्यकर्ते आणि राजकारणात बदल घडवण्याची इच्छा असलेल्या तरुणांच्या मनातील अस्वस्थतेला शब्द देणाऱ्या ठरत आहेत.
0 Comments