Ticker

6/recent/ticker-posts

जी. एच. रायसोनी विश्वविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


अमरावती | प्रतिनिधी : अनिता यादव

जी. एच. रायसोनी विश्वविद्यालय, अमरावती येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विनायक देशपांडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, योग हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित ठेवण्याचा विषय नसून तो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. वर्षातून एकदा योग दिन साजरा करून आरोग्यपूर्ण जीवनशैलीची उद्दिष्टे साध्य होणार नाहीत. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर, मन आणि बुद्धी यांच्यात समतोल साधला जातो, असे त्यांनी नमूद केले.

डॉ. देशपांडे म्हणाले, “योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. आज जगभरातील अनेक देश योगाचा स्वीकार करत असून त्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम अनुभवत आहेत. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यास शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते.”


यावेळी त्यांनी नियमित योगाभ्यासामुळे तणाव कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच अनेक गंभीर आजारांमधून लवकर सावरण्यास मदत मिळते, असेही सांगितले. निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छात्र कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट आणि कुलसचिव डॉ. स्नेहील जायसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. योग प्रशिक्षक भूषण पार्लिकर यांनी उपस्थितांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून त्यांचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले. एनएसएस अधिकारी कैलाश वाधवानी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, ताडासन, पद्मासन, मकरासन, भुजंगासन, वृक्षासन, त्रिकोणासन, शशांकासन आणि वज्रासन यांसह विविध योगप्रकारांचा सराव केला. सहभागी कर्मचाऱ्यांनी योगाच्या माध्यमातून निरोगी जीवन जगण्याचा संकल्पही केला.

या उपक्रमाच्या माध्यमातून जी. एच. रायसोनी विश्वविद्यालयाने आरोग्यविषयक जनजागृती, स्वस्थ जीवनशैलीचा प्रचार आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठातील विविध विभागांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments