वाशिम, : मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला ४ लाख ५४ हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेडशी येथील रहिवासी अश्विनी प्रविण तायडे यांनी १२ मे २०२६ रोजी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या माहेर असलेल्या येडशी येथील घरात ११ मेच्या रात्री अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून प्रवेश केला व घरातील आलमारीत ठेवलेले सोने-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी मंगरुळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपी हा येडशी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी पुणे येथे फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ पुण्याकडे रवाना झाले.
तांत्रिक माहितीच्या आधारे संघदीप चंदू वानखडे (रा. येडशी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने अश्विनी तायडे यांच्या वडिलांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने शेलू बाजार येथील दोन सोनारांना विकल्याची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष शेलू बाजार येथे कारवाई करून ५२ ग्रॅम सोने व ४२ ग्रॅम चांदी असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी मंगरुळपीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने अन्य ठिकाणीही चोरी केल्याची शक्यता तपासली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षिरसागर, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक किशोर शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
0 Comments