‘आता परीक्षा देवाची’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; संपूर्ण टीमची सदिच्छा भेट
मुंबई | प्रतिनिधी अनुप गोरे
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या लेखन-दिग्दर्शनातून साकारलेला ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात बॉक्स ऑफिसवर यशाची नवी उंची गाठत आहे. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या कलाकार व तंत्रज्ञांच्या टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
मुंबई येथे पार पडलेल्या या विशेष भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करताना त्यांनी चित्रपटाच्या सामाजिक आशयाचेही कौतुक केले.
"समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्या भावनांना स्पर्श करण्याची ताकद या चित्रपटात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी प्रेक्षकांपर्यंत सर्वांनी चित्रपटाला दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे," असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, निर्माते कैलास वाणी, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर, तंत्रज्ञ संकेत धोटकर, छायाचित्रकार प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण तसेच लीड मीडिया पीआर व मार्केटिंगचे कुशल कोंडे आणि अनूप गोरे यांच्यासह चित्रपटाशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी भावना व्यक्त करताना प्रवीण तरडे म्हणाले, "महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी ‘देऊळ बंद २’वर भरभरून प्रेम केले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली कौतुकाची थाप आमच्या संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी असून चित्रपटाच्या यशाचा आनंद अधिक द्विगुणित करणारी आहे."
दरम्यान, ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाने ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीनपासून ते शहरी भागातील मल्टिप्लेक्सपर्यंत प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. शेतकरी, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरांतील प्रेक्षक सहकुटुंब चित्रपटगृहांकडे आकर्षित होत आहेत. राज्यभरातील अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्लचे फलक झळकत असून दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची दमदार घोडदौड कायम आहे.
चौकट
‘देऊळ बंद २’ची यशस्वी वाटचाल
- महाराष्ट्रभर चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद
- सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्समध्ये हाऊसफुल्ल शो
- ग्रामीण व शहरी प्रेक्षकांचा समान प्रतिसाद
- दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी
- मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण टीमचे विशेष कौतुक
0 Comments