मंगरुळपीर | सुधाकर चौधरी
शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षणाची नवी दिशा देणाऱ्या ज्ञानकाशी इंग्लिश स्कूलच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य व सुसज्ज इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा शनिवार, दि. २८ जून रोजी वाशिम रोडवरील गोलवाडी फाटा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या दिमाखदार उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह पालक, नागरिक, हितचिंतक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. शामभाऊ खोडे होते. त्यांच्या शुभहस्ते नव्या इमारतीचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले. यावेळी वाशिम जिल्हाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा ठाकरे, भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, मेस्टा संघटनेचे कार्याध्यक्ष किरण चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना आमदार शामभाऊ खोडे यांनी ज्ञानकाशी इंग्लिश स्कूलच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत, शाळेच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. "शाळेच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी मी खंबीरपणे पाठीशी उभा राहीन. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांतदादा ठाकरे यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देत, संस्थेच्या जडणघडणीत आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. "ज्ञानकाशी इंग्लिश स्कूल ही शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला यावी," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, सुसज्ज सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे कौतुक करत, "ही संस्था भविष्यात जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र बनेल," असा विश्वास व्यक्त केला.
मेस्टा संघटनेचे कार्याध्यक्ष किरण चौधरी यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात, "आज लावलेले हे छोटेसे रोपटे उद्या विशाल वटवृक्षात रूपांतरित होईल. या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल," असे प्रेरणादायी उद्गार काढले.
या सोहळ्यास आयुषकेअर वेलनेस कंपनीचे सीएमडी रामेश्वर औंधकर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच सुप्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. गणेश जेगडे यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत शिक्षण, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व विशद केले.
यावेळी भगवंत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. गोविंद महाकाल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संजय राऊत, महिला व बालकल्याण सभापती सौ. लता चितलांगे, ग्रामविकास अधिकारी बेलखेडे साहेब, सचिन महाकाळ, रमेशभाऊ शिंदे, प्रकाश मुंधरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन ज्ञानकाशी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका सौ. चंचल खिराडे यांनी केले, तर संस्थेची वाटचाल, उद्दिष्टे आणि भविष्यातील नियोजन याविषयीचे सविस्तर प्रास्ताविक प्रा. संजय खिराडे यांनी मांडले. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेत शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी असलेल्या बांधिलकीची माहिती दिली.
या भव्य सोहळ्यास प्रा. अनिल पाटील, चंद्रकांत इंगळे, सुधाकर बिठाकरे, महादेव विश्वकर्मा, भोपाल वर्मा, गोपाल चौधरी, संतोष ठाकरे, महादेव खिराडे, अरविंद केदार, महादेव अंभोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बंधू, पालकवर्ग, आप्तेष्ट, हितचिंतक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानकाशी इंग्लिश स्कूलच्या नव्या वास्तूमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध होणार असून, हा उद्घाटन सोहळा मंगरुळपीर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, जल्लोष आणि टाळ्यांच्या कडकडाटात संपन्न झाला.
0 Comments