अमरावती, प्रतिनिधी अनिता यादव :
अमरावतीच्या स्क्वॉश क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत शहरातील तीन होतकरू युवा खेळाडूंची राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रीराज किशोर वाटणे (अंडर-14), मल्हार चेतन बोबडे आणि शौर्य नीलेश येराने (अंडर-13) हे तिघेही आगामी महाराष्ट्र राज्य स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत अमरावतीचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महाराष्ट्र स्क्वॉश रॅकेट संघटना आणि पुणे स्टेट स्क्वॉश रॅकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत पुणे येथील महाराष्ट्र स्क्वॉश अकॅडमी येथे राज्यस्तरीय स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राज्यभरातील गुणवंत खेळाडू सहभाग घेणार असून, अमरावतीच्या या तीन खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर स्थान मिळवले आहे.
पोडार इंटरनॅशनल स्कूल, बादनेरा येथे इयत्ता नववीत शिक्षण घेणारा श्रीराज किशोर वाटणे याची अंडर-14 गटात निवड झाली असून, टोमोए स्कूल, अमरावती येथील इयत्ता सहावीत शिक्षण घेणारे मल्हार चेतन बोबडे आणि शौर्य नीलेश येराने यांची अंडर-13 गटात निवड झाली आहे. निवड चाचणीदरम्यान तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, वेगवान खेळ आणि सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करत राज्यस्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
या तिन्ही खेळाडूंनी नियमित सराव, कठोर मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात सातत्याने प्रगती केली आहे. राज्यातील नामांकित खेळाडूंविरुद्ध उत्कृष्ट खेळ सादर करून अमरावतीचा नावलौकिक वाढविण्याचा त्यांचा निर्धार आहे.
अमरावती शहरातून स्क्वॉश या खेळात उदयास येणाऱ्या नव्या पिढीतील प्रतिभावान खेळाडूंचे हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. त्यांच्या निवडीमुळे शहरातील इतर विद्यार्थ्यांनाही स्क्वॉश या खेळाकडे आकर्षित होण्यास आणि या क्षेत्रात करिअर घडविण्यास निश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.
या यशाबद्दल संबंधित खेळाडूंचे पालक, प्रशिक्षक, शाळा प्रशासन तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यस्तरावर दमदार कामगिरी करत अमरावतीच्या क्रीडा परंपरेत नवे यशाचे पर्व लिहावे, अशी अपेक्षा सर्व अमरावतीकरांनी व्यक्त केली आहे.
0 Comments