मंगरूळपीर, सुधाकर चौधरी :
पर्यावरण संवर्धनाची काळाची गरज ओळखून मंगरूळपीर येथील बसस्थानक परिसरात "झाडे लावा, झाडे जगवा" या अभियानांतर्गत उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता समाजामध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमातून "वृक्षवल्ली आम्हा सोयरे, झाडे लावून सृष्टीचे रक्षण करूया" हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
या उपक्रमाच्या प्रमुख संयोजिका चंचल खिराडे यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने आपल्या आयुष्यात किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. केवळ वृक्षारोपण करून थांबणे पुरेसे नसून त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. झाडे ही केवळ पर्यावरणाचा समतोल राखत नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, स्वच्छ वातावरण आणि समृद्ध निसर्गाचा वारसा देण्याचे कार्य करतात, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला मंगरूळपीर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अशोक परळीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण संवर्धनासाठी शासनासोबत सामाजिक संस्था, महिला मंडळे आणि सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. शहर हिरवेगार, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्य मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बसस्थानकाचे व्यवस्थापक विटकरे सर आणि उपव्यवस्थापक राठोड सर यांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाल्यास प्रवाशांना सावली मिळण्यासोबतच परिसराचे सौंदर्यही वाढते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सुनिता वाघमारे, रेखा शिंदे, जयश्री इंगळे, सुनिता पाटील, चंदा ठाकूर, सरिता पुरोहित आणि कल्पना पाटील यांच्यासह अनेक महिला उत्साहाने सहभागी झाल्या. सर्व उपस्थितांनी विविध प्रकारची सावली देणारी व पर्यावरणपूरक रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली.
वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी "झाडे लावा, झाडे जगवा", "एक झाड लावा, अनेक जीव वाचवा" आणि "पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा" अशा घोषणा देत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. वाढत्या तापमानावर नियंत्रण, भूजल संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या रोपांच्या नियमित देखभालीची जबाबदारी स्थानिक स्तरावर स्वीकारण्यात आली. भविष्यात शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि मोकळ्या जागांवरही अशाच प्रकारचे वृक्षारोपण उपक्रम राबविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
पर्यावरण संरक्षण हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपल्या घराजवळ, शेतात, शाळेत, कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तर भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, निरोगी आणि हिरवेगार वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
"एक झाड लावा... अनेक जीव वाचवा; झाडे लावा... झाडे जगवा!" या पर्यावरणपूरक संदेशाने कार्यक्रमाची उत्साहपूर्ण सांगता करण्यात आली.
0 Comments