मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती अनिल स. किलोर यांच्या शुभहस्ते कोनशिला; न्यायमूर्ती सिध्देश्वर सुं. ठोंबरे यांची सन्माननीय उपस्थिती; न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
मंगरुळपीर, सुधाकर चौधरी दि. १७ जुलै : संतपरंपरा, सामाजिक सलोखा, धार्मिक एकात्मता आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंगरूळपीर नगरीच्या इतिहासात आज आणखी एका सुवर्णपानाची भर पडत आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या न्यायाच्या मूलभूत अधिकाराला अधिक सक्षम आणि आधुनिक अधिष्ठान देणाऱ्या जिल्हा न्यायालय तथा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ आज, शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अत्यंत दिमाखदार वातावरणात संपन्न होत असून, हा सोहळा मंगरूळपीरच्या न्यायिक, प्रशासकीय आणि ऐतिहासिक वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री. अनिल स. किलोर यांच्या शुभहस्ते या भव्य न्यायालयीन वास्तूची कोनशिला बसविण्यात येणार असून, मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री. सिध्देश्वर सुं. ठोंबरे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वाशिम श्री. अनिल सुब्रमण्यम हे राहणार असून, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मंगरूळपीर प्रज्ञा सं. काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
ऐतिहासिक मंगरूळपीरची न्यायिक परंपरा
मंगरूळपीर हे केवळ तालुक्याचे मुख्यालय नसून, ब्रिटिशकालापासून प्रशासकीय महत्त्व लाभलेले शहर आहे. पूर्वी अकोला जिल्ह्याचा भाग असलेले हे शहर सन १९९८ मध्ये वाशिम जिल्ह्याच्या निर्मितीनंतर नव्या जिल्ह्यात समाविष्ट झाले. सन १९५९ मध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर शहराचा प्रशासकीय विकास अधिक वेगाने झाला. आज येथे पोलीस उपविभागाचे मुख्यालय, विविध शासकीय कार्यालये आणि न्यायालयीन व्यवस्था कार्यरत असून, संपूर्ण परिसराच्या प्रशासकीय कारभारात मंगरूळपीरचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
इतिहासाची पाने चाळली असता मध्ययुगीन काळात मंगरूळपीर हे परगण्याचे प्रमुख केंद्र असल्याचे उल्लेख आढळतात. त्या काळातील स्थापत्य, सांस्कृतिक आणि प्रशासकीय प्रभाव आजही या शहराच्या परंपरेत जाणवतो. त्यामुळे ही नगरी केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर न्याय, प्रशासन आणि सामाजिक समन्वय यांची समृद्ध परंपरा जपणारी भूमी म्हणून ओळखली जाते.
संतपरंपरा आणि सामाजिक ऐक्याची भूमी
मंगरूळपीर या नावामागेही समृद्ध इतिहास दडलेला आहे. शहराच्या नावातील "पीर" हा शब्द प्रसिद्ध सूफी संत हजरत दादा हयात कलंदर यांच्या दर्ग्याशी जोडला जातो, तर श्री संत बिरबलनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीमुळे या भूमीला नाथ संप्रदायाचीही पावन परंपरा लाभली आहे. याच भूमीला चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाचेही पावित्र्य लाभले असल्याची श्रद्धा आहे. विविध धर्म, पंथ आणि संस्कृतींचे सहअस्तित्व जपणारी ही नगरी महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकात्मतेचे प्रेरणादायी उदाहरण मानली जाते.
धार्मिक वारसा, कृषी अर्थव्यवस्था आणि व्यापारी परंपरा या त्रिसूत्रीवर उभे असलेले मंगरूळपीर शहर आजही संपूर्ण परिसराचे आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून ओळखले जाते.
न्यायव्यवस्थेला आधुनिक अधिष्ठान
या ऐतिहासिक नगरीत उभारण्यात येणारी जिल्हा न्यायालय तथा अतिरिक्त सत्र न्यायालयाची नूतन इमारत ही केवळ एक प्रशासकीय वास्तू नसून, संविधानिक मूल्ये, कायद्याचे अधिराज्य आणि न्यायव्यवस्थेवरील जनविश्वास अधिक दृढ करणारे प्रतीक ठरणार आहे. आधुनिक न्यायालयीन दालने, न्यायाधीशांसाठी सुसज्ज कक्ष, विधिज्ञांसाठी आवश्यक सुविधा, नागरिकाभिमुख सेवा, सुरक्षित अभिलेख व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित न्यायालयीन प्रणाली यामुळे न्यायदान प्रक्रियेला अधिक वेग, पारदर्शकता आणि कार्यक्षमता प्राप्त होणार आहे.
ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना वेळेत, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण न्याय मिळावा, या उद्देशाने उभारण्यात येणारी ही इमारत न्यायसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार असून, वाशिम जिल्ह्याच्या न्यायिक अधोसंरचनेत मोलाची भर घालणार आहे.
भव्य सोहळ्यासाठी सर्व तयारी पूर्ण
हा ऐतिहासिक समारंभ कृष्णा लॉन, पॉवर हाउसजवळ, वाशिम रोड, मंगरूळपीर येथे आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. न्यायसंस्थेतील वरिष्ठ अधिकारी, न्यायाधीश, विधीज्ञ, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या समारंभाचे निमंत्रक अॅड. राजेश्वर शि. पांडे, अध्यक्ष, विधीज्ञ मंडळ, मंगरूळपीर तसेच प्रज्ञा सं. काळे, जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मंगरूळपीर यांनी सर्व न्यायप्रेमी नागरिकांना या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे.
संतपरंपरा, ऐतिहासिक वैभव, सामाजिक समरसता आणि प्रशासकीय परंपरेचा वारसा जपणाऱ्या मंगरूळपीर नगरीत उभारली जाणारी ही नवी न्यायालयीन वास्तू केवळ दगड-विटांची इमारत नसून, न्याय, संविधान, लोकशाही आणि जनविश्वास यांना समर्पित असलेले एक आधुनिक "न्यायमंदिर" म्हणून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
0 Comments