"ज्यांना तुमच्या आवाजापेक्षा तुमच्या अवस्थेची काळजी असते... तीच माणसं आयुष्याची खरी संपत्ती असतात."
लेखक : सुधाकर चौधरी
आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये शेकडो, कदाचित हजारो नंबर सेव्ह असतात. पण एक प्रश्न स्वतःलाच विचारून पाहा...
या शेकडो नंबरांपैकी किती जण खरंच आपल्या आयुष्यात आहेत?
मोबाईलच्या संपर्क यादीत नाव असणं आणि आयुष्यात स्थान असणं... यात जमीन-अस्मानाचा फरक असतो.
काही लोक आयुष्यभर फक्त तुमच्यावर नजर ठेवतात. तुम्ही कुठे गेलात, काय केलंत, किती कमावलं, कोणासोबत फिरलात, कोणत्या संकटात सापडलात... याची त्यांना उत्सुकता असते. पण तुम्ही आजारी पडलात, मनाने खचला आहात, घरात संकट आलं आहे किंवा तुम्हाला आधाराची गरज आहे, हे विचारण्यासाठी त्यांचा एक फोनही येत नाही.
त्यांना तुमची काळजी नसते... फक्त तुमच्या आयुष्याची माहिती हवी असते.
अशा नात्यांना नातं म्हणायचं तरी कसं?
काही नंबर मोबाईलमध्ये वर्षानुवर्षे जपून ठेवलेले असतात. पण त्यावरून ना कधी प्रेमाने चौकशी होते, ना वाढदिवसाची आठवण, ना सुखात अभिनंदन, ना दुःखात खांद्यावर हात.
फक्त नाव सेव्ह असतं... नातं मात्र कधीच संपलेलं असतं.
लक्षात ठेवा...
संवाद संपला की नातं हळूहळू मरायला लागतं.
नातं टिकवण्यासाठी रोज बोलणं आवश्यक नाही; पण वेळोवेळी मनापासून विचारपूस करणं आवश्यक आहे. "कसा आहेस?" हा प्रश्न औपचारिक नसून आपुलकीचा असला पाहिजे. "काही गरज असेल तर सांग" हे वाक्य केवळ तोंडदेखलं नसून कृतीत उतरलं पाहिजे.
आज अनेक नाती फक्त सोशल मीडियावर जिवंत आहेत.
स्टेटस पाहतात... फोटोला लाईक करतात... पण मनातील वेदना कधी वाचत नाहीत.
कारण त्यांच्यासाठी तुम्ही माणूस नसता... तुम्ही फक्त एक अपडेट असता.
आयुष्यात काही माणसं अशीही असतात, जी रोज फोन करत नाहीत; पण संकटाच्या वेळी पहिला हात धरतात. महिनोनमहिने भेट होत नाही, पण भेट झाली की डोळ्यांत आपुलकी असते. शब्द कमी असतात; पण विश्वास अमाप असतो.
तीच खरी नाती असतात.
म्हणूनच कधी कधी मोबाईलमधून काही नंबर डिलीट करणं म्हणजे माणसं दूर करणं नसतं... तर मनावरील अनावश्यक ओझं हलकं करणं असतं.
कारण प्रत्येक सेव्ह केलेला नंबर आपला असतोच असं नाही... आणि प्रत्येक आपलं माणूस मोबाईलमध्ये सेव्ह असतंच असंही नाही.
नाती रक्ताने जुळत नाहीत... ती जुळतात प्रेमाने... विश्वासाने... जिव्हाळ्याने... एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभं राहण्याने.
आज अनेकांना नाती हवी आहेत; पण जबाबदारी नको आहे. प्रेम हवं आहे; पण वेळ द्यायची नाही. आदर हवा आहे; पण समोरच्याचा सन्मान करायचा नाही.
अशी नाती काचेसारखी असतात... चमकतात खूप... पण पहिल्याच धक्क्यात तुटून जातात.
खरं नातं तेच... जे तुमच्या यशावर टाळ्या वाजवतं... आणि अपयशात तुमचा हात घट्ट धरून म्हणतं—
"घाबरू नको... मी आहे."
म्हणून, ज्यांना या शब्दांचा अर्थ समजतो... त्यांनी आपल्या माणसांना वेळ द्या. त्यांना फोन करा. त्यांची चौकशी करा. त्यांच्या डोळ्यातील न बोललेले अश्रू ओळखा. कारण...
उद्या मोबाईलमध्ये नंबर राहतील... पण ती माणसं कायमची निघून गेली तर?
तेव्हा पश्चात्तापाशिवाय काहीही उरणार नाही.
लक्षात ठेवा...
नाती तोंडावर दाखवायची नसतात... ती मनापासून जगायची असतात.
प्रेम शब्दांत नाही... तर वेळेत दिसतं.
जिव्हाळा स्टेटसमध्ये नाही... तर संकटात धावून येण्यात दिसतो.
आणि...
ज्या दिवशी आपल्या माणसांसाठी वेळ काढणं थांबतं, त्या दिवशी नात्यांचा मृत्यू सुरू होतो.
म्हणून मोबाईलमधले नंबर नाही... मनातली माणसं जपा. कारण शेवटी आयुष्याची श्रीमंती बँकेतील पैशांनी नाही... तर शेवटच्या क्षणी डोळ्यात पाणी आणणाऱ्या "आपल्या माणसांनी" मोजली जाते.
0 Comments