Ticker

6/recent/ticker-posts

अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात वाशिम पोलिसांची दैदिप्यमान कामगिरी; १७ पदकांची घवघवीत कमाई


वाशिम : यवतमाळ येथे १६ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा-२०२६ मध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य अशा एकूण १७ पदकांवर नाव कोरले. विविध तांत्रिक, वैज्ञानिक, कायदेविषयक तसेच कौशल्याधारित स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून वाशिम पोलिसांनी अमरावती परिक्षेत्रात आपला दबदबा सिद्ध केला. या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस दलाच्या वैज्ञानिक तपास पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक कौशल्याला पुन्हा एकदा गौरवाची पावती मिळाली.


अमरावती परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेल्या या कर्तव्य मेळाव्यात गुन्ह्यांचा वैज्ञानिक तपास, न्यायवैद्यक विज्ञान, छायाचित्रण, चित्रीकरण, संगणक तंत्रज्ञान, श्वान पथक, बोटांचे ठसे, पुरावे जतन करणे, कायदेविषयक ज्ञान आदी विषयांवर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला.

वैज्ञानिक तपास विभागात सुवर्णयश

गुन्हे तपास, फौजदारी कायदे, नियम, कार्यपद्धती व न्यायालयीन निर्णय या स्पर्धेत पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी सुवर्णपदक पटकावून आपल्या अभ्यासपूर्ण ज्ञानाची छाप पाडली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी बोटांचे ठसे परीक्षण तसेच पुरावे वर्गीकरण व पॅकिंग या दोन स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवत दुहेरी यश संपादन केले. याशिवाय अधिकारी गुन्हे छायाचित्रण स्पर्धेत त्यांनी रौप्यपदकही मिळविले. पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले यांनी बोटांचे ठसे परीक्षण स्पर्धेत रौप्यपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.

पोलीस हवालदार महेश आकरे यांनी न्यायवैद्यक विज्ञान लेखी परीक्षा स्पर्धेत रौप्य, निरीक्षण चाचणी स्पर्धेत कांस्य आणि संशयिताचे रेखाचित्र स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून आपल्या बहुआयामी कौशल्याचा ठसा उमटविला. त्याच स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग इंगळे यांनी कांस्यपदक मिळविले.

छायाचित्रण व चित्रीकरणातही ठसा

गुन्ह्यांच्या तपासात छायाचित्रणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गुन्हे छायाचित्रण स्पर्धेत पोलीस हवालदार गजानन गोटे यांनी रौप्यपदक मिळविले. गुन्हे चित्रीकरण स्पर्धेत पोलीस हवालदार नंदकिशोर भडके यांनी रौप्यपदक पटकावत उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन केले.

संगणक कौशल्यातही वर्चस्व

संगणक जागरूकता विभागात पोलीस कॉन्स्टेबल सुशील बोरकर यांनी संगणक वस्तुनिष्ठ परीक्षा स्पर्धेत सुवर्ण आणि एमएस ऑफिस स्पर्धेत कांस्यपदक मिळवून आपले तांत्रिक प्राविण्य सिद्ध केले. तर पोलीस कॉन्स्टेबल गोपाल चौधरी यांनी .नेट/जावा ऑनलाइन स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.

श्वान पथकाची उल्लेखनीय कामगिरी

श्वान पथक स्पर्धेतही वाशिम पोलीस दलाने उत्कृष्ट यश मिळविले. शोधी श्वान 'बेला' सोबत श्रेणी प्रमुख भास्कर राखोंडे यांनी कांस्यपदक मिळविले. स्फोटक शोधी श्वान 'अनिका' सोबत पोलीस कॉन्स्टेबल दशरथ ढोके यांनी सुवर्णपदक पटकावले. अमली पदार्थ शोधी श्वान 'रॉय' सोबत पोलीस कॉन्स्टेबल व्यंकटेश रावलेवाढ यांनी रौप्यपदक मिळवत श्वान पथकाची कार्यक्षमता सिद्ध केली.

वैज्ञानिक तपास क्षमतेला मिळाली गौरवाची पावती

या कर्तव्य मेळाव्यातील यश हे वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षण, अभ्यासपूर्ण तयारी, वैज्ञानिक तपास कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक मानले जात आहे. गुन्ह्यांचा शास्त्रोक्त तपास, घटनास्थळी पुराव्यांचे अचूक संकलन, न्यायवैद्यक विज्ञानाचा प्रभावी वापर, डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब आणि नागरिकांना अधिक परिणामकारक व गुणवत्तापूर्ण पोलीस सेवा देण्यासाठी जिल्हा पोलीस दलाची क्षमता अधिक सक्षम झाल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.

अमरावती परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत वाशिम पोलीस दलाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्याचा गौरव वाढला असून, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ज्ञान, कौशल्य आणि समर्पणाची दखल संपूर्ण परिक्षेत्रात घेतली जात आहे.

पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन

या दैदिप्यमान यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खटमोडे (पाटील), भा.पो.से. यांनी सर्व पदक विजेते अधिकारी, कर्मचारी, श्वान पथकातील सदस्य, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक अधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भविष्यातही अशाच जोमाने कार्य करत वाशिम जिल्हा पोलीस दलाचा नावलौकिक अधिक उंचावावा, वैज्ञानिक तपास, तांत्रिक कौशल्य आणि नागरिकाभिमुख पोलीस सेवेतील उत्कृष्टता कायम राखावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

Post a Comment

0 Comments