आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या भेसळमुक्त महाराष्ट्र मोहिमेचे स्वागत; शहरातील हॉटेलांमध्ये भेसळ, निकृष्ट तेल व अमली पदार्थांचा वापर होत असल्याचा अनिल गावंडे यांचा गंभीर आरोप
मंगरूळपीर : राज्यात भेसळमुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्याच्या निर्णयाचे स्वागत करत, मंगरूळपीर शहरासह वाशिम जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाची विशेष तपासणी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपचे उपनगराध्यक्ष तथा नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अनिल गावंडे यांनी केली आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळीविरुद्ध कठोर मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत, गावंडे यांनी मंगरूळपीर शहरातील काही हॉटेलांमध्ये अन्नपदार्थांमध्ये कथित भेसळ, वारंवार वापरले जाणारे निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होईल, अशा प्रकारच्या गंभीर बाबी सुरू असल्याचा आरोप केला आहे.
गावंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, शहरातील अनेक ठिकाणी मोठमोठे हॉटेलांचे फलक लावून काही व्यावसायिक "आम्ही हप्ते देतो" अशा प्रकारची मक्तेदारी असल्याचे सांगत बिनधास्त व्यवसाय करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशा प्रकारामुळे प्रामाणिक व्यावसायिकांवर अन्याय होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच संबंधित विभागातील काही अधिकारी कथितपणे हप्ते घेऊन अशा प्रकारांना अभय देत असल्याचा आरोपही गावंडे यांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मंगरूळपीर तालुका व वाशिम जिल्हा संपूर्णपणे भेसळमुक्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम राबवावी, हॉटेलांवर अचानक धाडी टाकून अन्नपदार्थांचे नमुने तपासावेत तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर परवाना रद्द करण्यापर्यंतची कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या गंभीर आरोपांची दखल घेऊन वाशिम जिल्ह्यासह मंगरूळपीर शहरात विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत असल्याचे गावंडे यांनी म्हटले आहे.
शेवटी त्यांनी "बंद करो ये भ्रष्टाचार... यह जनता की आवाज है!" अशी घोषणा देत, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
0 Comments