लेखक : सुधाकर चौधरी
"आई म्हणजे देवाने माणसाला दिलेलं पहिलं मंदिर... आणि तिचं प्रेम म्हणजे आयुष्यभर न संपणारा आशीर्वाद."
आई तर आईच असते...
तिला कधी गणित जमत नाही...
५० रुपये मागितले तर १०० रुपये हातात ठेवते.
एक चपाती मागितली तर दोन वाढते.
आणि...
"इकडे ये... अजिबात मारणार नाही," असं म्हणत जवळ बोलावते, पण दोन फटकेही प्रेमानेच घालते.
कारण तिच्या प्रत्येक रागामागे माया असते... आणि प्रत्येक फटक्यामागे लेकराचं भविष्य दडलेलं असतं.
आई म्हणते...
"मर जरा..."
पण तिच्या तोंडून निघालेला तो शब्दही देव स्वीकारत नाही.
कारण आईच्या मनात लेकराच्या मृत्यूची इच्छा नसतेच...
तिच्या प्रत्येक श्वासात फक्त एकच प्रार्थना असते—
"देवा... माझ्या लेकराला सुखी ठेव."
आई स्वतः भुकेली झोपेल...
पण लेकराच्या ताटात भाकरी कमी पडू देणार नाही.
ती स्वतःच्या पायात तुटकी चप्पल घालेल...
पण लेकराच्या पायात नवी चप्पल घालण्यासाठी स्वतःच्या इच्छा मारून टाकेल.
तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या वाढत जातात...
कारण ती आपल्या लेकराच्या आयुष्यातील अडचणी स्वतःच्या कपाळावर लिहून घेत असते.
लेकराला ताप आला की...
आईची रात्र जागी होते.
लेकराच्या डोळ्यात अश्रू आले की...
आईच्या हृदयात वेदना होतात.
लेकरू कितीही मोठं झालं...
तरी तिच्यासाठी ते कायम लहानच असतं.
जगात सगळे विचारतात—
"किती कमावलं?"
पण आई फक्त एवढंच विचारते—
"बाळा... जेवलास का?"
या एका प्रश्नात तिचं संपूर्ण विश्व सामावलेलं असतं.
आज अनेक मुलं मोठी झाली...
मोठ्या गाड्या घेतल्या...
मोठमोठी घरे बांधली...
पण त्या घराच्या एका कोपऱ्यात बसलेली आई मात्र एकाच गोष्टीची वाट पाहत असते—
"माझं लेकरू दोन मिनिटं माझ्याजवळ बसावं..."
तिच्या अंतःकरणाचं मोल...
तिच्या पोटी जन्मलेल्या लेकरालाही पूर्णपणे कधी कळत नाही.
मग जगाला ते कसं कळणार?
आज मी आईबद्दल लिहायला बसलो...
पण शब्द अपुरे पडले...
लेखणी थबकली...
डोळे पाणावले...
कारण...
आईला शब्दांत मांडणं म्हणजे समुद्राला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे.
आईवर हजारो पुस्तके लिहिली जातील...
लाखो कविता रचल्या जातील...
कोट्यवधी शब्द खर्च होतील...
तरीही...
"आई" या एका शब्दाची उंची गाठता येणार नाही.
आई भवानीच्या साक्षीने सांगतो...
हा लेख लिहिताना अनेकदा शब्द धूसर झाले...
कारण डोळ्यांत पाणी आलं होतं.
आई म्हणजे...
निस्वार्थ प्रेम...
अखंड त्याग...
न संपणारी माया...
आणि देवाने पृथ्वीवर पाठवलेला जिवंत आशीर्वाद.
म्हणून...
आई जिवंत असेपर्यंत...
तिच्या कुशीत डोकं ठेवून बसा...
तिच्याशी दोन शब्द बोला...
तिच्या हातचं जेवण खा...
कारण...
ज्या दिवशी आईची हाक कायमची बंद होते...
त्या दिवशी जगात कितीही माणसं आसपास असली, तरी माणूस आतून अनाथ होतो.
शेवटी एवढंच...
"देव प्रत्येकाच्या घरी राहू शकत नव्हता... म्हणून त्याने 'आई' निर्माण केली."
✍️ लेखक : सुधाकर चौधरी
0 Comments