Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन व कोनशिला समारंभ उत्साहात संपन्न; आधुनिक न्यायालयीन संकुलामुळे न्यायदान प्रक्रियेला मिळणार नवी गती


मंगरुळपीर | सुधाकर चौधरी | दि. १८ जुलै २०२६

मंगरुळपीर शहराच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी अनुभवास आला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या अत्याधुनिक, सर्वसुविधायुक्त नूतन इमारतीच्या भूमिपूजन व कोनशिला समारंभाचा भव्य सोहळा कृष्णा लॉन, पॉवर हाऊसजवळ, वाशिम रोड, मंगरुळपीर येथे सायंकाळी ६.३० वाजता अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात पार पडला. न्यायव्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून या वास्तूमुळे मंगरुळपीरसह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक न्यायसेवा उपलब्ध होणार आहे.

या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री. अनिल स. किलोर यांच्या शुभहस्ते नूतन न्यायालयीन इमारतीची कोनशिला करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री. सिद्धेश्वर सु. ठोंबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिमचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. अनिल सुब्रमण्यम होते.

न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

कोनशिला समारंभानंतर मार्गदर्शन करताना माननीय न्यायमूर्ती श्री. अनिल स. किलोर यांनी न्यायाधीश, वकील आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित सर्व घटकांना अत्यंत मोलाचा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, न्यायदान ही केवळ नोकरी नसून समाजाप्रती असलेली एक पवित्र जबाबदारी आहे. न्यायासनावर बसताना प्रत्येकाने आपल्या पदाची, खुर्चीची आणि न्यायमंदिराच्या पावित्र्याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण त्या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही जनसामान्यांनी न्यायदेवतेप्रमाणे आपला आदर केला पाहिजे, असे कार्य प्रत्येकाने आपल्या कारकिर्दीत करावे, असे त्यांनी आवाहन केले.

त्यांनी अहंकाराच्या दुष्परिणामांवर भाष्य करताना भगवान गणेशाशी संबंधित एका उदाहरणाद्वारे नम्रतेचे महत्त्व स्पष्ट केले. व्यक्ती जेव्हा अहंकाराच्या आहारी जाते तेव्हा त्याचे परिणाम किती गंभीर असतात, हे त्यांनी प्रभावी शब्दांत मांडले. न्यायाधीशांनी निष्पक्षता, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपत न्यायदान करणे हेच समाजाचे खरे ऋण फेडण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबर त्यांनी आधुनिक न्यायालयीन इमारतीमुळे न्यायालयाचे कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ होईल. नागरिकांना जलद न्याय मिळण्यास या प्रकल्पाची मोठी मदत होणार असून न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.

न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे यांचा दर्जेदार बांधकामावर भर

माननीय न्यायमूर्ती श्री. सिद्धेश्वर सु. ठोंबरे यांनी आपल्या भाषणात न्यायालयीन इमारतीच्या दर्जेदार बांधकामावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, ही वास्तू भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी न्यायदानाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे तिच्या बांधकामात कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये.

बांधकामाची गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी संबंधित अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक नागरिकांनी सतत लक्ष ठेवावे. कामात कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास तात्काळ संबंधित विभागाला माहिती द्यावी. दोषी कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक व सुसज्ज न्यायालयीन इमारतींचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी ही वास्तू न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिक सुविधाजनक ठरेल, असे सांगितले.

अध्यक्षीय मनोगत

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. अनिल सुब्रमण्यम यांनी प्रास्ताविकातून मंगरुळपीर न्यायालयाच्या कार्याचा आढावा घेतला. वाढती न्यायालयीन कामे, नागरिकांची वाढती अपेक्षा आणि बदलत्या काळातील तांत्रिक गरजा लक्षात घेऊन आधुनिक न्यायालयीन संकुल उभारण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. नव्या इमारतीमुळे जिल्ह्यातील न्यायदान प्रक्रियेला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधीज्ञ मंडळाची भूमिका

मंगरुळपीर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. राजेश्वर शि. पांडे यांनी नवीन न्यायालयीन इमारतीमुळे वकिलांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण होणार असल्याचे सांगितले. वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज, सुरक्षित व सन्मानजनक वातावरण उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक बांधिलकी

समारंभाची सुरुवात स्वागतगीताने झाली. त्यानंतर बंजारा समाजाच्या पारंपरिक लोकनृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला सांस्कृतिक वैभव लाभले.

सामाजिक उत्तरदायित्व जपत वाशिम जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायाधीशांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. तसेच मंगरुळपीर विधीज्ञ मंडळाच्या वतीने गरजू नागरिकांना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. न्यायव्यवस्थेची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकाने पाहिला.

आधुनिक न्यायालयीन संकुलाची वैशिष्ट्ये

सुमारे २३२०.४० चौ.मी. क्षेत्रफळाच्या प्रत्येक मजल्यावर उभारण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीत नागरिक, न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी यांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे.

स्टिल्ट फ्लोअर

  • ४० चारचाकी व १५० दुचाकी वाहनांसाठी पार्किंग
  • प्रशस्त लॉबी
  • सुरक्षा कक्ष
  • सहा लिफ्ट
  • मीटर रूम
  • अग्निरोधक कार्यालयीन कक्ष
  • वाहन चालकांची खोली
  • महिला, पुरुष व तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे
  • दिव्यांगांसाठी रॅम्प

पहिला मजला

  • प्रतीक्षालये
  • महिला व पुरुष कैद्यांसाठी स्वतंत्र गार्डरूम
  • लोकअदालत कक्ष
  • मानसोपचार समुपदेशन कक्ष
  • व्हल्नरेबल विटनेस कक्ष
  • न्यायाधीश कक्ष
  • ई-सेवा केंद्र
  • कँटीन
  • हिरकणी कक्ष
  • मुद्देमाल कक्ष
  • डिस्पेन्सरी
  • प्रशासकीय कार्यालये

दुसरा व तिसरा मजला

  • दिवाणी न्यायालये (कनिष्ठ व वरिष्ठ स्तर)
  • न्यायाधीश कक्ष
  • अधीक्षक कार्यालय
  • साक्षीदार व पक्षकारांसाठी स्वतंत्र प्रतीक्षागृहे
  • सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष
  • सरकारी वकील कक्ष
  • पुरुष बार रूम
  • बार लायब्ररी
  • संगणक व टायपिंग विभाग
  • जतन कक्ष
  • सार्वजनिक स्वच्छतागृहे

चौथा मजला

  • जिल्हा न्यायाधीश न्यायालय
  • सिव्हिल रेकॉर्ड कक्ष
  • बार लायब्ररी
  • प्रशासकीय कार्यालये
  • न्यायाधीशांसाठी स्टुडिओ अपार्टमेंट
  • साक्षीदार व पक्षकारांसाठी स्वतंत्र सुविधा

याशिवाय संपूर्ण परिसरात सिमेंट रस्ते, भूमिगत जलसाठा, जलनिस्सारण व्यवस्था, संरक्षक भिंत आणि आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. सध्या इमारतीच्या पायाभरणीचे काम प्रगतीपथावर आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या ऐतिहासिक सोहळ्यास जिल्हा न्यायाधीश-१ श्री. जे. पी. झपाटे, श्री. सागर मुंगिलवार, श्री. पंकज नायगावकर, श्री. के. सी. कलाल, श्री. एस. डी. तारे, श्रीमती पी. व्ही. राणे, श्री. एस. एस. सहस्त्रबुद्धे, श्रीमती सहस्त्रबुद्धे, श्रीमती ए. आर. फक्राबदकर यांच्यासह न्यायव्यवस्थेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच स्थानिक आमदार श्री. श्याम खोडे, जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निकेश खाटमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल क्षीरसागर, पोलीस निरीक्षक श्री. शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मुख्य अभियंता श्रीमती सुष्मा बोंद्रे, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ श्रीमती कविता बी. रंगारी, अधीक्षक अभियंता श्री. सुनील थोटांगे, कार्यकारी अभियंता श्री. यू. एस. बिरारी, नगराध्यक्ष अशोक भाऊ परळीकर, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते किशोर देशमुख जिल्हा विधीज्ञ मंडळाचे पदाधिकारी, विविध तालुक्यांतील वकील, न्यायालयीन कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आभार प्रदर्श

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, मंगरुळपीर श्रीमती प्रज्ञा सं. काळे यांनी अत्यंत हृदयस्पर्शी आणि भारदस्त शब्दांत आभार प्रदर्शन करत या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वीतेत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी नमूद केले की, मंगरुळपीरच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा ठरला असून, माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. अनिल स. किलोर साहेब आणि माननीय न्यायमूर्ती श्री. सिद्धेश्वर सु. ठोंबरे साहेब यांच्या शुभ उपस्थितीने या सोहळ्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिकच उजळून निघाले आहे. या भव्य आणि संस्मरणीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक आणि कार्यक्रमाच्या नियोजनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. नूतन न्यायालयीन न्याय मंदिराची इमारत ही केवळ विटा-मातीची वास्तू नसून न्याय, विश्वास, पारदर्शकता आणि जनसेवेचे प्रतीक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, सर्वांच्या सहकार्य, सदिच्छा आणि सामूहिक सहभागामुळे हा ऐतिहासिक सोहळा अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी नमूद केले आणि या मूल्यांना अधिक बळकटी देणाऱ्या या नव्या न्यायमंदिराच्या उभारणीस सर्वांचे सहकार्य व सदिच्छा लाभत राहोत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी उपस्थित प्रत्येकाचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सुधीर घोडचर यांनी केले

मंगरुळपीर येथे आयोजित जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन व कोनशिला समारंभाचे सूत्रसंचालन अॅड. सुधीर घोडचर ,संचलन न्यायाधीश तारे साहेब व नेरळीकर साहेबांनी यांनी अत्यंत प्रभावी, ओघवत्या आणि नेटक्या शैलीत केले. त्यांच्यासोबत

 कार्यक्रमातील प्रत्येक मान्यवरांचा यथोचित परिचय करून देत संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रे कुशलतेने सांभाळली. त्यांच्या उत्कृष्ट निवेदनामुळे कार्यक्रमाला अधिक शिस्तबद्ध आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. उपस्थित मान्यवर व नागरिकांनी त्यांच्या प्रभावी सूत्रसंचालनाचे विशेष कौतुक केले.

न्यायव्यवस्थेच्या विकासातील ऐतिहासिक पाऊल

मंगरुळपीर येथे उभारण्यात येणारी ही आधुनिक न्यायालयीन इमारत केवळ एक वास्तू नसून न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणाचे प्रतीक ठरणार आहे. अत्याधुनिक सुविधा, डिजिटल न्यायप्रक्रिया, नागरिकाभिमुख सेवा आणि सर्वसमावेशक नियोजनामुळे ही इमारत भविष्यात न्यायदान अधिक वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे मंगरुळपीरसह संपूर्ण वाशिम जिल्ह्याच्या न्यायव्यवस्थेला नवे बळ मिळणार असून हा दिवस न्यायालयीन इतिहासात कायम स्मरणात राहील.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता

न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणाऱ्या या भव्य आणि ऐतिहासिक सोहळ्याची सांगता अत्यंत शिस्तबद्ध व राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात राष्ट्रगीताने करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवर, न्यायाधीश, विधीज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रगीतासाठी सन्मानपूर्वक उभे राहून राष्ट्राला अभिवादन केले. राष्ट्रगीताच्या मंगल स्वरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला आणि या ऐतिहासिक सोहळ्याचा समारोप अत्यंत दिमाखदार, प्रेरणादायी व अविस्मरणीय वातावरणात झाला.

Post a Comment

0 Comments