हरिनामाने दुमदुमले शहर; वारकऱ्यांना विमा कवच, वृक्षारोपण, साडी-ड्रेस, जीवनावश्यक साहित्य व विद्यार्थ्यांना गाद्यांचे वाटप
अकोला, गजानन हरणे दि. २ जुलै : श्रीक्षेत्र श्रद्धासागर, अकोट येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या विश्वरत्न माऊली ह.भ.प. श्री संत वासुदेव महाराज यांच्या भव्य पालखी पायदळ सोहळ्याचे अकोला महानगरात तीन दिवस अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि जंगी स्वागत करण्यात आले. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण अकोला नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे, नागरिक, व्यापारी आणि भाविकांनी पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करून अकोल्याच्या समृद्ध भक्तीपरंपरेचा परिचय घडवून दिला.
यंदा पालखी सोहळ्याचे सोळावे वर्ष असून भक्ती, सेवा, समता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. शासनमान्यता प्राप्त विदर्भातील या वैशिष्ट्यपूर्ण पालखी सोहळ्याने वारकरी परंपरेला आधुनिक सामाजिक उपक्रमांची जोड देत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
दि. २८ जून रोजी सायंकाळी पालखीचे अकोल्यात आगमन होताच रेल्वे स्टेशन परिसरातील हिंदू धर्मशाळेजवळ पुंडकर परिवाराच्या वतीने पालखीचे प्रथम स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमदार रणधीरभाऊ सावरकर, महापौर शारदाताई खेडकर, ह.भ.प. वासुदेव महल्ले पाटील, नगरसेवक पवन महल्ले, समाजसेवक गजानन हरणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालखीचे पूजन करून फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषात संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी तापडिया नगर, सातव चौक मार्गे दिवेकर वाचनालय येथे मुक्कामी पोहोचली. गोपालराव दोड परिवाराच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, निवास व मुक्कामाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी गुप्ते मार्गावर वामनराव फुंडकर यांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर उमरी रोड, लोखंडे ले-आऊट मार्गे मोठी उमरी येथील विठ्ठल मंदिरात पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. विठ्ठल भजनी मंडळ व मित्र परिवाराने भोजन, विश्रांती आणि सेवाभावाने वारकऱ्यांची व्यवस्था सांभाळली. दुपारनंतर जठारपेठ, रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाईन, सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसर तसेच शहरातील विविध भागांत पालखीचे स्वागत करण्यात आले. अशोक पटोकर यांच्या निवासस्थानी आणि गजानन मंदिर परिसरात संतोष सावरकर परिवाराच्या वतीने महाप्रसाद व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली.
दि. ३० जून रोजी गजानन पेठ, राऊतवाडी, गणेशनगर आणि वृंदावननगर येथे जयदीप सोनखासकर यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांना टॉवेलसह आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. द्वारका नगरीत वै. बाबुरावजी पवित्रकार परिवाराने महाप्रसादाची व्यवस्था केली. सहकारनगर येथे पंकज जायले यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. महेशनगर येथे सत्यनारायण जाजू यांच्या पुढाकारातून महिला वारकऱ्यांना साडी-चोळीचे वितरण करण्यात आले. तुकाराम चौक, कोठारी वाटिका व गुरुकुल नगरी, खडकी येथेही पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. टिकार परिवाराने मुक्काम, महाप्रसाद आणि वारकऱ्यांना जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वितरण करून सेवाभावाची परंपरा जपली.
दि. १ जुलै रोजी दत्त मंदिर, शक्तीनगर येथे दत्त मंदिर मित्र परिवाराने फराळाची व्यवस्था केली. याच ठिकाणी पुरुष वारकऱ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. पाटील दूध डेअरी परिसरात ह.भ.प. वासुदेवराव महल्ले पाटील यांच्या वतीने पालखीचे स्वागत, कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. सुमरण फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा रमाकांत खेतान यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी औषधोपचार किटचे वितरण करण्यात आले. शहरातील विविध चौक, मंदिरे आणि वसाहतींमध्येही पालखीचे स्वागत करण्यात आले. प्रभात किड्स येथे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. याच ठिकाणी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमास ह.भ.प. सारंगधर महाराज मेहुणकर, ह.भ.प. गोपाल महाराज, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य रामेश्वर भिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई येथील भक्तांच्या वतीने वारकरी विद्यार्थ्यांना गाद्यांचे वितरण करण्यात आले.
पालखी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश. दि. २ जुलै रोजी पालखीच्या मुक्कामस्थळी वृक्षारोपण करण्यात आले. अनिल कोरपे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक सकाळ आणि सायंकाळच्या मुक्कामस्थळी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जात आहे. अध्यात्म आणि पर्यावरण यांची सुंदर सांगड या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून घालण्यात येत असल्याने भाविकांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
या पालखी सोहळ्याची सर्वाधिक उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला देण्यात येणारे विमा संरक्षण. तसेच संपूर्ण प्रवासात दुपारच्या मुक्कामस्थळी प्रवचने, रात्री कीर्तन, अखंड हरिनाम, अभंग, भक्तिगीते आणि भजन यामुळे वारकरी परंपरेचे जतन होत असून नव्या पिढीपर्यंत संत विचार पोहोचविण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे.
अकोल्यातील तीन दिवसांच्या मुक्कामादरम्यान हजारो भाविकांनी संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले. अनेकांनी तन, मन आणि धनाने सहकार्य करून पालखी सोहळा यशस्वी केला. विविध सामाजिक संस्था, मंडळे, व्यापारी, नागरिक आणि वारकरी भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अकोल्याची भक्तीपरंपरा अधिक समृद्ध केली.
या यशस्वी आयोजनासाठी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले, पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक ह.भ.प. अंबादास महाराज मानकर, गुरुमाऊली स्वागत समितीचे संयोजक अविनाश गावंडे, पंकज जायले, जयदीप सोनखासकर, ह.भ.प. माधवराव ठाकरे, ह.भ.प. गजानन दुधाळ, ह.भ.प. गोपाल महाराज झांमरे, अनिल कोरपे, गजानन हरणे, चंद्रशेखर ठाकरे तसेच समस्त गुरुमाऊली भक्त परिवाराने विशेष परिश्रम घेतले.
अखेर अकोला शहरातील तीन दिवसांचा भक्तिमय मुक्काम पूर्ण करून पालखी चिखलगाव व पातूर मार्गे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाली. तीन दिवस अकोला नगरी हरिनामाच्या अखंड गजराने, विठ्ठलभक्तीच्या उत्सवाने आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाने अक्षरशः भारावून गेली. भक्ती, सेवा, समता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा पालखी सोहळा अकोलेकरांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.
0 Comments