Ticker

6/recent/ticker-posts

जी. एच. रायसोनी करंडक एकांकिका स्पर्धेची नोंदणी सुरू


राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा; विजेत्यांना लाखोंची रोख पारितोषिके

अमरावती अनिता यादव : जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती आणि एस. जी. आर. नॉलेज फाउंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या जी. एच. रायसोनी करंडक एकांकिका स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी व युवा कलावंतांना आपल्या अभिनयकौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा यंदाही उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, महाराष्ट्रातील विविध शहरांमधील महाविद्यालयीन विद्यार्थी व कलाकार या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यंदाच्या स्पर्धेची प्राथमिक फेरी अंजनगाव बारी रोड येथील जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. त्यानंतर अंतिम फेरी १ ते ४ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांनी २४ सप्टेंबरपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. अंतिम फेरीतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १ लाख ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७१ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी २१ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चर फाउंडेशनच्या संचालक तथा मुख्य आयोजक डॉ. मृणाल नाईक यांनी अमरावती विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधा

स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी
जी. एच. रायसोनी करंडक – नोंदणी संकेतस्थळ
या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी आयोजन समिती प्रमुख शुभांगी ठाकरे अथवा जनसंपर्क अधिकारी अनीता यादव यांच्याशी संपर्क साधता येईल.

— प्रतिनिधी

Post a Comment

0 Comments