Ticker

6/recent/ticker-posts

पाऊस गायब, सोयाबीन सुकले; आता पंचनाम्यांची प्रतीक्षा!


निंबीतील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन; तात्काळ नुकसानभरपाईसह कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मंगरुळपीर | प्रतिनिधी :
तालुक्यात पावसाने तब्बल दीड महिन्यापासून दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक अक्षरशः करपून जात आहे. निंबी परिसरातील सोयाबीन पिकाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अनेक शेतांमध्ये सोयाबीन बिनाशेंगाचे सुकले आहे, तर काही ठिकाणी पावसाअभावी पिकाची वाढ खुंटल्याने उत्पादनाची आशाही मावळली आहे. त्यामुळे हतबल झालेल्या निंबी येथील शेतकऱ्यांनी सुकलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी पिकाची वाढ खुंटली असून अनेक शेतांमध्ये शेंगाच धरलेल्या नाहीत. काही ठिकाणी उभे पीक पूर्णपणे सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणार की नाही, असा गंभीर प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.

जलसाठे कोरडे; भविष्यात पाणीटंचाईचे संकट?

तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणे, नदी-नाले आणि जलस्रोतांमध्येही अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास खरीप हंगामासोबतच आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

“पिके हातची गेली, आता शासनाने पंचनामे करण्यास विलंब करू नये,” अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून शासनाने तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पावसाअभावी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता मंगरुळपीर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार तातडीने आर्थिक मदत, पीक नुकसानभरपाई व आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी निंबी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

दि. १० सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देताना राहुलदेव मनवर, संतोष पवार, गिरधारी पवार, रमेश राठोड, विनेश राठोड, सुनील पवार, मनोहर जाधव, गोपीचंद राठोड, मनोहर टोपले, भाडूसिंग चव्हाण, किशोर जाधव, अरविंद टोपले आदी शेतकरी उपस्थित होते.

— वाशिम खबर आवाज महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments