संघटनात्मक व जनसंपर्कातील कार्याची दखल; जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ चितलांगे व आमदार श्यामभाऊ खोडे यांना नियुक्तीचे श्रेय
कारंजा | प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्याला बळकटी देण्यासाठी सक्रियपणे कार्यरत असलेले संदीप कृष्णराव काळे (रा. कारंजा, ता. कारंजा, जि. वाशीम) यांची भाजपच्या वाशिम जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक, संघटनात्मक, जनसंपर्क क्षेत्रातील कार्यासह पंडित दीनदयाल कार्यविस्तार योजनेअंतर्गत वाशिम–मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक म्हणून केलेल्या कार्याची पक्षाने दखल घेत ही जबाबदारी सोपविली आहे.
संदीप काळे यांच्या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेत त्यांच्यावर असलेला विश्वास अधोरेखित झाला असून, आगामी काळात जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.
“नियुक्तीचे श्रेय नेतृत्वाला”
आपल्या नियुक्तीचे श्रेय भाजपचे वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ चितलांगे आणि मंगरुळपीरचे आमदार श्यामभाऊ खोडे यांना देत संदीप काळे यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.
पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन विस्तारासाठी प्रभावीपणे काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
संघटनवाढीसाठी नवी जबाबदारी
नियुक्ती आदेशात नमूद केल्याप्रमाणे, काळे यांनी जिल्हा चिटणीस या पदावर कार्यरत राहून पक्ष संघटना वाढीसाठी प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पक्ष संघटना आणि जनतेमध्ये सुसंवाद कायम ठेवत संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, संदीप काळे यांच्या नियुक्तीचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
0 Comments