Ticker

6/recent/ticker-posts

डीजेच्या दणदणाटाला फाटा; शिवनेरी मंडळाने जपला भक्ती-सामाजिकतेचा सूर!

रक्तदान, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसह दहा दिवसांचा गणेशोत्सव; रवी वानखडे यांच्या पुढाकारातून बंद पडलेल्या मंडळाला नवसंजीवनी

वाशिम सुधाकर चौधरी : गणेशोत्सव म्हटले की डीजेचा कर्णकर्कश आवाज, रोषणाई आणि मिरवणुकीचा जल्लोष असे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, या रूढ चौकटीला छेद देत वाशिम शहरातील शिवनेरी गणेशोत्सव मंडळ, जुनी नगरपरिषद यांनी यंदा डीजेमुक्त आणि समाजोपयोगी उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. सामाजिक कार्यकर्ते तथा मनसे शहराध्यक्ष रवी भाऊ वानखडे यांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या या मंडळाला पुन्हा नवसंजीवनी मिळाली.

एकेकाळी वाशिम शहरातील मानाचे आणि आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळख असलेल्या शिवनेरी मंडळाची धुरा रवी वानखडे यांनी हाती घेत तरुण कार्यकर्त्यांना एकत्र केले. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या गणेशोत्सवात दहा दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

विशेष म्हणजे, ‘डीजे-मुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाऐवजी पारंपरिक ढोल-ताशा, भजन आणि सनईच्या मंगल निनादात गणरायाची आराधना करण्यात आली. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. मंडळाच्या या निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

रक्तदानापासून क्रीडा स्पर्धांपर्यंत उपक्रमांची रेलचेल

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर, लहान मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने आरती, पूजा आणि धार्मिक कार्यक्रमही उत्साहात पार पडले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी रवी वानखडे यांच्यासह मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले.

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान; महाप्रसादाने सांगता

गणेशोत्सवाच्या समारोपप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठांचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाने उपस्थितांच्या भावनांना स्पर्श केला.

यानंतर शिवनेरी गणेशोत्सव मंडळ, जुनी नगरपरिषद, वाशिम यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या महाप्रसादाला आमदार श्याम भाऊ खोडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी आमदार श्याम भाऊ खोडे यांनी मंडळाच्या डीजेमुक्त गणेशोत्सवाचे आणि समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. तसेच मंडळाला पुन्हा उभारी देत विविध उपक्रम राबविल्याबद्दल रवी वानखडे यांच्या कार्याचे अभिनंदन केले.

शिवनेरी गणेशोत्सव मंडळाने यंदा भक्तीला सामाजिक बांधिलकीची जोड देत उत्सवाचे वेगळे रूप नागरिकांसमोर ठेवले. गणेशोत्सव हा केवळ जल्लोषाचा नव्हे, तर समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृती जपण्याचा उत्सवही ठरू शकतो, हे शिवनेरी मंडळाने आपल्या उपक्रमांतून दाखवून दिले.

Post a Comment

0 Comments