Ticker

6/recent/ticker-posts

विनयभंगप्रकरणी आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास


मंगरुळपीर न्यायालयाचा निकाल; चार हजार रुपयांचा दंड, रक्कम पीडितेस देण्याचे आदेश

मंगरुळपीर : महिलेचा विनयभंग करून तिला धमकी दिल्याप्रकरणी आरोपी आकाश भीमराव वाघमारे (रा. रहीत) यास मंगरुळपीर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. डी. तारे यांच्या न्यायालयाने दोषी ठरविले. आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड, तर कलम ५०६ अंतर्गत सहा महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असून, दंडाची एकूण चार हजार रुपयांची रक्कम पीडितेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, ३० डिसेंबर २०१९ रोजी पीडिता माहेरहून पती व मुलाबाळांसह सासरी जाण्यासाठी निघाली होती. मंगरुळपीर येथील मानोरा चौकात वाहनाची वाट पाहत असताना आरोपी आकाश वाघमारे तेथे आला. यावेळी त्याने सार्वजनिक ठिकाणी पीडितेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास ए.एस.आय. मोहरसिंग जाधव यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध कागदोपत्री पुरावे तसेच दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विजय डी. आरु यांनी सहायक संचालक पी. पी. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले. पीडितेस न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल क्षिरसागर, मंगरुळपीर; ठाणेदार किशोर शेळके; ए.एस.आय. ज्योती डोंगरदिवे (पैरवी अधिकारी); पोलीस शिपाई विशाल फुफुटे व सरुबाई हिंगमिरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments