Ticker

6/recent/ticker-posts

मनुष्य जन्माचं गूढ… पुण्याचं फळ की कर्मांची शिक्षा?


मनुष्य जन्माचे खरे गूढ…!

असं म्हणतात, असंख्य जन्मांचं पुण्य साठवल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो…
पण कधी कधी मनात प्रश्न उठतो—हा जन्म खरंच पुण्याचं फळ आहे, की मागच्या जन्मी केलेल्या कर्मांची शिक्षा भोगण्यासाठी मिळालेली एक संधी?

कारण पाहा ना…
माणसाइतकं दुःख कोणत्याही जीवाच्या वाट्याला येत नाही.

पशू-पक्षी वर्तमानात जगतात.
भूक लागली तर खातात, तहान लागली तर पाणी पितात, थकले की विसावतात आणि दिवस संपला की सगळं विसरून शांत झोपी जातात.

पण माणूस…
तो ना वर्तमानात जगतो, ना स्वतःला जगू देतो!

गेलेल्या काळाच्या पश्चात्तापात तो स्वतःला जाळत राहतो,
आणि न आलेल्या उद्याच्या चिंतेत आजचा आनंद गमावत राहतो.

जे घडलं ते पुन्हा पुन्हा आठवत राहतो,
जे मिळालं नाही त्याची खंत करत राहतो,
आणि जे अजून घडलंच नाही त्याची चिंता करत राहतो.

कधी पैसा कमी पडतो म्हणून दुःख,
कधी माणसं बदलली म्हणून दुःख,
कधी अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून दुःख,
तर कधी आपल्या माणसांनीच आपल्याला समजून घेतलं नाही म्हणून दुःख!

माणूस सुखाच्या शोधात इतका धावत राहतो,
की त्याच्या पायाखाली असलेलं सुख कधी निघून जातं, हे त्यालाच कळत नाही.

आयुष्य खरं तर खूप मोठं नसतं…
पण मनुष्य त्याला आठवणी, अपेक्षा, अहंकार, मत्सर, चिंता आणि पश्चात्तापांनी इतकं जड करून टाकतो की, जगणं ओझं वाटू लागतं.

शेवटी एका वळणावर येऊन जाणवतं—
आयुष्य कमी नव्हतं…
आपण ते जगण्यातच कमी पडलो.

ज्यांच्यासाठी धावलो, ते कायमचे सोबत राहिले नाहीत.
ज्यांच्यासाठी स्वतःला हरवलं, त्यांनी आपली किंमत कधी जाणलीच नाही.
आणि ज्यांना आपण आयुष्यभर वेळ दिला, त्यांच्यासाठी आपल्याकडे शेवटी वेळच उरला नाही.

म्हणून कदाचित मनुष्य जन्म ही शिक्षा नाही;
तो स्वतःच्या मनाने निर्माण केलेल्या दुःखातून मुक्त होण्याची एक संधी आहे.

भूतकाळ बदलता येत नाही,
भविष्य आपल्या हातात नाही…
पण आजचा क्षण मात्र आपल्या हातात आहे.

म्हणून कालच्या पश्चात्तापात जळू नका,
उद्याच्या चिंतेत विरघळू नका.
ज्यांनी सोडलं त्यांना जाऊ द्या,
जे मिळालं नाही त्याचा हट्ट सोडा,
आणि जे आज आपल्या सोबत आहे त्याची किंमत ओळखा.

कारण—

आयुष्य नेहमी ‘उद्या’च्या शोधात संपतं,
आणि ‘आज’ मात्र नकळत निघून जातं…!

शेवटी एवढंच—
देवाने मनुष्य जन्म दिला की नाही, यापेक्षा
मिळालेलं आयुष्य आपण माणूस म्हणून जगलो का,
हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ प्रत्येकावर येते.

जन्म आपल्या हातात नव्हता,
मृत्यू आपल्या हातात नाही;
पण या दोघांच्या मधलं आयुष्य
कसं जगायचं—हा निर्णय मात्र आपल्या हातात आहे…!

शब्दांकन : सुधाकर चौधरी

Post a Comment

0 Comments