विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त व सामाजिक बांधिलकी रुजविण्यावर मार्गदर्शन
धानोरा खुर्द : विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, स्वावलंबन, संघभावना आणि सामाजिक बांधिलकीची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने श्री धानोरकर आदर्श विद्यालय, धानोरा खुर्द येथे ८ ऑक्टोबर रोजी स्काऊट्स व गाईड्सचे एकदिवसीय संघनायक प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या प्रशिक्षण शिबिरात श्री धानोरकर आदर्श विद्यालय, श्री मो.च. ठाकरे विद्यालय कासोळा, जय किसान हायस्कूल फाळेगाव, जिल्हा परिषद शाळा कळंबा तसेच जिल्हा परिषद शाळा शिवनी आदी शाळांमधील स्काऊट्स व गाईड्स यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. ए. एम. धानोरकर मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक स्काऊट्स श्री. के. एल. पवार सर आणि जिल्हा संघटक गाईड्स कु. मनीषा ढोके मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी गाईडर पदमवार मॅडम, गाईडर होले मॅडम, स्काऊटर घोरसडे सर, इंगोले सर, उचित सर, ढेंगळे सर यांच्यासह विविध शाळांतील स्काऊट्स व गाईड्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकदिवसीय प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संघनायकाची भूमिका, नेतृत्वाची जबाबदारी, शिस्तबद्ध वर्तन, संघभावना तसेच विविध उपक्रमांमध्ये प्रभावीपणे सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्काऊट्स-गाईड्स चळवळ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण असून, अशा प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये 'स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी' कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्काऊटर श्री. उचित सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्काऊटर श्री. ढेंगळे सर यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व संबंधित स्काऊट्स-गाईड्स पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments