Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम पोलिसांची अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध धडक कारवाई!


समृद्धी महामार्गावर ४६९ किलो गांजा जप्त; दोन वाहनांसह तब्बल २ कोटी ६४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल ताब्यात

वाशिम सुधाकर चौधरी : अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी वाशिम पोलीस दलाने मोठी धडक कारवाई केली आहे. समृद्धी महामार्गावर मालेगाव व कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ४६९ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या कारवाईत एकूण २ कोटी ६४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेला विशेष प्राधान्य दिले असून, त्यांच्या पूर्वीच्या अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्समधील अनुभवाचा फायदा वाशिम जिल्ह्यातील कारवाईला होत आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अंमली पदार्थांविरोधात सातत्याने धडक कारवाया सुरू आहेत.

मालेगाव हद्दीत १२६ किलो गांजा; वाहन सोडून चालक पसार

दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ५ ते ५.१५ वाजताच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांना महिंद्रा मॅक्स पिकअप क्रमांक एमएच १२ वाय क्यू २०८५ हे मालवाहू वाहन संशयास्पद स्थितीत उभे आढळले.

पोलिसांनी वाहन चालकाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता चालक वाहन सोडून पसार झाला. त्यानंतर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल १२६ किलो गांजा आढळून आला. गांजा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ७३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

कारंज्यात ३४३ किलो गांजा; ट्रकच्या कॅबिनमध्ये गुप्तपणे लपविला होता

त्याच दिवशी सकाळी सुमारे १० वाजताच्या दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम व कारंजा शहर पोलिसांनी समृद्धी महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी मोहीम राबविली.

यावेळी आयशर ट्रक क्रमांक एमएच ०४ जेके २४४६ संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तो थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने आपले नाव सुनिल गणपतराव सूर्यवंशी, रा. लातूर असे सांगितले. वाहनातील मालाबाबत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता चालकाच्या कॅबिनमध्ये गुप्तपणे लपवून ठेवलेला तब्बल ३४३ किलो गांजा, अंदाजे १ कोटी ७१ लाख ५० हजार रुपये किमतीचा, आढळून आला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला आयशर ट्रक, अंदाजे ३० लाख रुपये किमतीचा, असा एकूण २ कोटी १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन कारवायांत ४६९ किलो गांजा जप्त

मालेगाव आणि कारंजा शहर पोलिसांच्या या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ४६९ किलो गांजा आणि दोन वाहने असा २ कोटी ६४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, मालेगाव येथील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमकडे तर कारंजा येथील गुन्ह्याचा तपास कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावर पोलिसांची करडी नजर

समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गाच्या दोन्ही दिशांना सातत्याने पेट्रोलिंग करण्यात येत आहे. या गस्तीमुळे संशयास्पद वाहनांवर पोलिसांची नजर असून, अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाईचा फास आवळला जात आहे.

या कारवाईमुळे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, वाशिम पोलिसांनी तस्करांना स्पष्ट इशारा दिला आहे.


कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी : पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष ठाकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे, मालेगावचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे, जिल्हा वाहतूक शाखेचे सपोनि गोकुळसिंग राठोड तसेच पोउपनि निलेश जाधव, सचिन गोखले, विशाल बोरकर यांच्यासह पोलीस अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.



Post a Comment

0 Comments