जगद्गुरू प्रॉडक्शन निर्मित ‘कीर्तन’ चित्रपटाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दिमाखदार पोस्टर लाँच
आध्यात्म, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देणारा चित्रपट; विविध संस्था व गरजूंसाठी तब्बल दोन कोटींचे योगदान
पुणे अनुप गोरे : कॉर्पोरेट क्षेत्रातील उज्ज्वल कारकीर्द आणि भविष्यातील अनेक संधींचा त्याग करून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला वाहून घेतलेल्या डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या निर्मितीतील ‘कीर्तन’ या बहुचर्चित चित्रपटाचे पोस्टर एका दिमाखदार सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले.
“भक्ती की बाजार | तूच सांग विठ्ठला!” या आशयघन टॅगलाईनने सजलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विठ्ठल-माऊलीचे रूप आणि भक्ताच्या निस्सीम, निरपेक्ष भक्तिभावाचे अत्यंत भावस्पर्शी दर्शन घडते. त्यामुळे पोस्टर प्रकाशन सोहळ्यालाच या चित्रपटाच्या आशयाची उत्सुकता निर्माण झाली.
‘कीर्तन’ हा केवळ भक्तीचा महिमा सांगणारा चित्रपट नसून श्रद्धा-अंधश्रद्धा, मानवी मूल्ये, बदलती सामाजिक परिस्थिती, वारकरी परंपरा, वारी आणि परमेश्वरावरील अढळ विश्वास यांचा समकालीन संदर्भातून वेध घेणारा प्रगल्भ चित्रपट असल्याचे सांगण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाचा आणि संतपरंपरेचा भावस्पर्शी अनुभव देणारा हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असून जगभरात एकाच वेळी प्रदर्शित करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संतपरंपरेच्या विचारातून राष्ट्रनिर्माणाची दिशा
यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनकार्याची प्रेरणा घेऊन डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.
“जे का रंजले गांजले, त्यासी म्हणावे आपुले” हा संतविचार त्यांनी आपल्या आचरणातून जपला आहे. त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून युवा पिढीला आध्यात्म, इतिहास, मानवता आणि लोकसेवेची दिशा देण्याचे प्रभावी कार्य होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
‘कीर्तन’ समाजाला योग्य दिशा देईल : आशिष शेलार
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. “बोलतो तेच करतो” हा विश्वास निर्माण करणारी व्यक्तिमत्त्वे आज दुर्मीळ झाली आहेत; मात्र डॉ. चेतनानंद महाराज यांनी आपल्या संकल्पित जीवनकार्यातून आणि कृतीतून तो विश्वास सिद्ध केला आहे, असे ते म्हणाले.
आजच्या स्पर्धात्मक युगात विविध माध्यमांमधून तणाव वाढत असताना ‘कीर्तन’ हा चित्रपट समाजाच्या दुःखावर संवेदनशील भाष्य करून प्रबोधनाची आणि सकारात्मक जीवनदृष्टीची दिशा देऊ शकतो, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. राष्ट्रउभारणीला पूरक असलेल्या डॉ. चेतनानंद महाराज यांच्या विविध उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
आधुनिक तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड आवश्यक
डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले की, राष्ट्राची उभारणी करणारी आणि मानवकल्याणाचा विचार करणारी सक्षम पिढी केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घडणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाला अध्यात्म, संस्कार आणि समर्पणाची जोड देणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील विचार युवा पिढी आणि समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी चित्रपट हे अत्यंत प्रभावी माध्यम असून, आपल्या जीवनकार्याचाच एक भाग म्हणून चित्रपट निर्मितीचा उपक्रम स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन कोटींचे सामाजिक योगदान; सेवाकार्याचा आदर्श
या सोहळ्यात जगद्गुरू विश्वकल्याण फाउंडेशन आणि जगद्गुरू प्रॉडक्शनच्या वतीने आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था तसेच गरजू व्यक्तींना तब्बल दोन कोटी रुपयांचे आर्थिक योगदान व धनादेश वितरित करण्यात आले.
डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचे कार्य केवळ प्रवचन किंवा आध्यात्मिक ज्ञान देण्यापुरते मर्यादित नसून, कृतीतून समाजसेवेचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
कॉर्पोरेट क्षेत्रातील उज्ज्वल कारकीर्द सोडून आध्यात्मिक क्षेत्राची वाट स्वीकारताना त्यांनी वैयक्तिक सुख-सुविधांपेक्षा समाजकार्याला प्राधान्य दिले. मंदिर उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचे योगदान मिळवून देण्यापासून ते विविध सामाजिक उपक्रमांना मदत करण्यापर्यंत त्यांचे कार्य सुरू आहे. विशेष म्हणजे एवढे व्यापक कार्य करूनही त्यांचे कुटुंब पुण्यात भाड्याच्या घरात राहत असून गावी केवळ सुमारे ३०० चौरस फुटांचे साधे घर असल्याची माहिती समोर आल्यानंतर उपस्थितांनी त्यांच्या त्यागभावनेचे कौतुक केले.
मान्यवरांची उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्यास सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व श्रीगुरु डॉ. नारायण महाराज जाधव बाबा, खासदार श्रीरंग बारणे, ए.ए. फिल्म्सचे प्रमुख व विख्यात चित्रपट वितरक अनिल थडानी, महावितरणचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार, भारताचे माजी क्रिकेटपटू केदार जाधव, आजी-माजी विधिमंडळ सदस्य व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर, देहू, आळंदी, दगडूशेठ गणपती तसेच जंगली महाराज संस्थानचे विश्वस्त व पदाधिकारी यांच्यासह आध्यात्मिक, सामाजिक, औद्योगिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
चित्रपटातील कलाकार संदीप पाठक, प्राजक्ता हनमघर, आर्या घारे, तेजस बर्वे, सुरेश विश्वकर्मा, बालकलाकार गोरज देखणे, गीतकार गुरु ठाकूर, संगीतकार विजय गावंडे, दिग्दर्शक अतुल जगदाळे तसेच प्रमुख कलाकार उपेंद्र लिमये यांच्या वतीने त्यांच्या पत्नी स्वाती लिमये यांच्यासह हजारो प्रेक्षक या सोहळ्याला उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि संत-वारकरी साहित्य पूजनाने झाली. प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी भक्तिगीते सादर करून वातावरण भक्तिमय केले. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अभिनेते संदीप पाठक यांनी केले.
“भक्तीचा बाजार की भक्तीची निस्सीम वाट?… ‘तूच सांग विठ्ठला!’ — संतपरंपरेचा विचार आणि आधुनिक काळाचा आरसा दाखवणारा ‘कीर्तन’!”
0 Comments