Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी मोडक : आत्महत्याग्रस्त असहाय्य शेतकरी कुटुंबीयांना दिली जगण्याची प्रेरणा












वाशिम शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा सर्वांसाठीच चिंतनाचा विषय आहे. आत्महत्या केल्यानंतर शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचे आभाळच कोसळते. त्यामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्तेची वेळच येऊ नये, अशी परिस्थिती बनविण्याची गरज आहे. आणि हेच महत्वपूर्ण कार्य दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ (यवतमाळ) यांच्या  माध्यमातून सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून चालणार्‍या विविध प्रकल्पातून संस्थाचालकांच्या संवेदनशिलतेचा परिचय होतो. त्यांच्याया सेवाभावी कार्यात जिल्हाप्रशासन सोबत आहे. शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी कोणतीही संस्था एक पाऊल टाकत असेल तर जिल्हा प्रशासन दोन पावले पुढे येऊन सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी आज (ता. 12) येथे केले.
असहाय्य अवस्थेत सापडलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविणार्‍या दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा भगिनींसाठी स्थानिक स्वागत लॉन येथे दिवाळी भाऊबिज कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मोडक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक नंदूजी देशपांडे होते. वाशीम जिल्हा संघचालक शंकरराव ढोबळे, जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक, नारायणराव जाधव, संस्थेचे सचिव विजयराव पत्रे, श्रीमती निलिमाताई मंत्री, मिराबाई घाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी प्रास्ताविक भाषणात संस्थेची माहिती देताना गजानन वनसकर म्हणाले की, दीनदयाळ संस्थेच्या कुटुंब आधार योजनेच्या माध्यमातून वाशीम जिल्ह्यातील 80 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच 34 परिवाराला स्वंयरोजगार उभा करून दिला आहे. या संस्थेने 2006 पासून विशेष प्रकल्प हाती घेतले असून आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना स्वंय रोजगार उपलब्ध करून देणे व विविध प्रकल्पांद्वारे पुनर्वसन करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याच प्रमाणे आगामी काळात शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये, यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहे. शेतकरी कुटुंबातील युवकाला व महिलेला योजनेचा  केंद्रबिंदू मानून त्यांना शाश्वत कृषी विकास प्रकल्प आणि कृषिपूरक उद्योग कार्यक्रमांद्वारंद्वारे व्यवसायाभिमूख बनविण्याचा संस्थेचा उद्देश आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलामुलींचे पालकत्व स्वीकारणे, शेतकर्‍यांच्या मुलामुलींच्या तंत्र व व्यावसायिक शिष्यवृत्ती देणे, प्रतिवर्षी 100 मुलामुलींच्या शिक्षणाची निःशुल्क व्यवस्था करणे आदींसह विविध प्रकल्प हाती घेतले आहे. समुपदेशना सोबतच भाऊबिज व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असून त्यांना मानसिक व भावनिक आधार मिळावा तसेच सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी संस्थेतर्फे प्रतिवर्षी भाऊबिज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती गजानन वनसकर यांनी प्रास्ताविक भाषणात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले. गणेश सावंत यांनी आभार मानले. तसेच ज्यांनी कार्यक्रमाला आर्थिक मदत केली. त्यांचे संस्थेच्यावतीने आभार मानण्यात आले. 
............
भाऊबिज व स्नेहमिलन कार्यक्रम 
येथील स्वागतलॉन येथे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवांनी उपस्थित मान्यवरांचे औक्षण केले. यावेळी त्यांना ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी दीनदयाल संस्थेने मदत केल्यानंतर आपले विविध उद्योग सुरू करणार्‍या महिलांनी आपले अनुभव कथन केले. आणि संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. 

Post a Comment

0 Comments