Ticker

6/recent/ticker-posts

निकष गुंडाळा , तात्काळ नुकसानीच्या सर्व्हेचे आदेश द्या

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांची पालकमंत्र्याकडे मागण
वाशिम : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. परंतु २४ तासात ६५ मीमी पाऊस झाला नसल्याच्या निकषावर बोट ठेवून शासनाने नुकसानीचे सर्व्हे करण्याचेच आदेशित केलेले नाही. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जटील निकषांवरील बोट बाजूला करून प्रशासनाला तात्काळ नुकसानीचे सर्वेक्षणासाठी आदेशित करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्याकडे केली आहे.  

अख्ख्या सप्टेंबर महिनाभर जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ चालविला होता. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, उडीद, मुग, तुर, कपाशी, हळद व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणच्या शेतातील सोयाबिनच्या शेंगा काळ्या झाल्या, त्यांना बुरशी लागली, कोंब फुटले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास ऐनवेळी हिरावल्या गेला आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. आपण २९ सप्टेबरला नुकसानीचे सर्वे व शेतकऱ्यांना अर्थिक मदती द्यावी यासाठी मुख्यमंत्र्यासह पालकमंत्र्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. सर्वेक्षण सुरू होईल अशी अपेक्षा होती. परंतु पुन्हा एकदा १९८३ चा शासन निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर उठू पाहत आहे. सदर शासन निर्णयानुसार २४ तासामध्ये ६५ मीमी पेक्षा जास्त पाऊस नोंदविल्या गेला तरच अतिवृष्ट्री गृहित धरून नुकसान भरपाई देण्यात येते. जिल्ह्यात २४ तासात ६५ मीमी पाऊस झाला नसला तरी सततच्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन बोलाविले होते. परंतु शासनाने अद्याप सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन नुकसानीचे सर्वे सुरू झाले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय असून सततच्या पावसाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २४ तासात ६५ मीमी पावसाची अट रद्द करून तात्काळ सर्वेचे आदेश द्यावेत व शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांना भेटून केली आहे.

Post a Comment

0 Comments