Ticker

6/recent/ticker-posts

शभुसावळ ते जामनेर, पहुर ह्या मार्गाचे चौपदरीकरण झालेच पाहिजे ,कुर्‍हा पानाचे सरपंच जीवन पाटील यांची मागणी


भुसावळ— भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे हे विकसनशील गाव भुसावळ ते जामनेर या मार्गावर व तसेच नशिराबाद -बोदवड -मलकापुर  या मार्गावर अश्या दोन महत्वाच्या राज्यमार्गावर वसलेले असून विकसनशील गाव आहे.  केंद्र शासनाने भुसावळ -जामनेर -पहूर या सध्याच्या राज्यमार्ग क्रमांक 44 रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रुंदीकरण व चौपदरीकरण करावे.  भुसावळ रेल्वे जंक्शन असल्यामुळे व भुसावळात  रेल्वेने उतरून अजिंठा लेणीला जाणाऱ्या पर्यटकांना हा रस्ता सोयीचा व जवळचा ठरतो. जपान सरकारने याअगोदर अजिंठा भुसावळ रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग करण्याचा मानस व्यक्त केला होता व तसेच निधीची सुद्धा उपलब्धता करून दिली होती .परंतु कुठे माशी शिंकली कळत नाही .
पहुर-जामनेर पर्यंत हा रस्ता चारपदरी होऊन मात्र जामनेर ते भुसावळ हा रस्ता चारपदरी झालेला नाही. अर्थात अजिंठा या लेण्याला अनेक बौद्धधर्मीय भेट देतात व त्यासाठी अनेक विदेशातीलच नव्हे तर देशातील सुद्धा कानाकोपऱ्यातील पर्यटकांना भुसावळ ही सोयीचे  जंक्शन असल्यामुळे येथे सर्व  रेल्वे थांबतात .त्यामुळे पर्यटन विकासासाठी व तसेच या क्षेत्रातील विकासासाठी भुसावळ -जामनेर- पहूर हा राष्ट्रीय महामार्ग होणे आवश्यक आहे. कित्येक वर्षापासून या रस्त्याच्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा व मागणी केलेली आहे . तसेच भुसावळ जामनेर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे आंदोलनसुध्दा करावे लागले होते. तसेच नशिराबाद- बोदवड- मलकापूर हा मार्ग सुद्धा चारपदरी केला तर या मार्गावर असलेल्या गावांचा सुद्धा विकास होईल. या मार्गावर रहदारी वाढुन मलकापुर हे अंतर जवळ होईल. त्यामुळे इंधन ,वेळ याची सुद्धा बचत होईल . तरी या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री मा. नितिन गडकरी तसेच महाराष्ट्राचे मंत्री श्री. एकनाथ शिंदे ,पालक मंत्री श्री गुलाबराव पाटील व तसेच बांधकाम विभागाकडे या संदर्भात कुर्‍हा येथील सरपंच श्री. जीवन पाटील व उपसरपंच श्री. विलास रंदाळे  व ग्रामपंचायत सदस्य व तसेच अनेक नागरिकांनी यासंदर्भात सर्वांना निवेदन पाठवलेले आहे. तरी या निवेदनाची दखल घेऊन या भागाचा विकास होण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments