मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह (IPS)
यांच्या आदेशाने मालमत्ता तसेच शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व वाशिम जिल्ह्यातील गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करत जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाया करून वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत सर्व ठाणेदार यांना आदेशित केले. वाशिम जिल्ह्यातील घडणाऱ्या चोरी, जबरी चोरी, दरोडे यांसारख्या गंभीर घटनांवर प्रतिबंध करून सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याकरिता वाशिम जिल्ह्यात नव्यानेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर प्रतिबंधात्मक कार्यवाही सेल' स्थापन करण्यात आले आहे.
गुन्हेगारांना प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्याकरिता वाशिम जिल्हा निर्मितीपासूनचे गुन्हे अभिलेखावरून सराईत गुन्हेगारांच्या पोलीस स्टेशननिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहे. त्यामध्ये एकूण १८, ४५६ आरोपींची नोंद असून ०२ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या एकूण ७८७ गुन्हेगारांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी व अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात एकूण १३ पोलीस स्टेशनमध्ये 'प्रतिबंधात्मक कार्यवाही सेल' ची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना त्यांचे हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्याच्यावर प्रतिबंध करत गुन्हेगारीवर अंकुश लावण्याची जबाबदारी देण्यात आली असून त्याचा नियमित आढावा मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) हे मासिक गुन्हे आढावा बैठकीदरम्यान घेत असतात. त्याचबरोबर पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम येथे ०१ केंद्रीकृत पथक तयार करण्यात आले असून याद्वारे सराईत गुन्हेगारांविरुद्ध त्यांच्या गुन्ह्याच्या स्वरूपावरून फौजदारी प्रक्रिया संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायदा अशा कायद्यान्वये प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. मागील ०१ ऑक्टोंबर, २०२१ पासून जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर कलम १०७ सि.आर.पी.सी. नुसार ३६६, कलम ११० सि. आर. पी. सी. नुसार १६३, एम. पी.डी.ए. कायद्यांतर्गत ०५, मोक्का कायद्यांतर्गत ०१ व ५५ (ब) मु.पो.का.मध्ये ०३ प्रकरणांमध्ये १६ आरोपींवर तडीपारीची कारवाई अश्या एकूण ५३९ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत.
मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी जनतेस आवाहन केले आहे कि, जनतेने अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना न घाबरता पुढे येऊन त्यांच्याविरोधात तक्रार द्यावी जेणेकरून अशा गुंड प्रवृत्तीच्या इसमांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारीवर प्रतिबंध करण्यात येईल.
0 Comments