Ticker

6/recent/ticker-posts

सेवा प्रणाली (SEVA – Service Excellence & Victim Assistance)चा आता उपविभागीयपोलीस अधिकारी कार्यालये व दूरक्षेत्र स्तरावर विस्तार.


वाशिम जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस स्टेशन व दूरक्षेत्र स्तरावर तक्रार घेऊन येणारे तक्रारदार / पिडीत व्यक्तीच्या तक्रारीची तत्परतेने दखल घेऊन लोकाभिमुख (Citizen Centric) पद्धतीने जबाबदारीने (Accountability) व पारदर्शकपणे (Transparency) नागरिकांना चांगली सेवा प्रदान (Good Service Delivery) करणे तसेच तक्रारदार यांचे समाधान झाले किंवा नाही याबाबत त्यांच्याकडून अभिप्राय जाणून घेऊन प्रभावी पोलिसिंग राबविणेकरिता वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सेवा प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे.

यापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये जिल्ह्यातील १३ पोलीस स्टेशन स्तरावर सेवा प्रणाली उत्कृष्टपणे काम करत असून त्याबाबत नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील ०३ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, १० दूरक्षेत्र (चौकी) त्यामध्ये उकळीपेन, शेंदूरजना, उंबर्डा बाजार, राजाकिन्ही, कामरगाव, शेलू बाजार, पोहरादेवी. मेडशी, वाकद व गोवर्धना चौकी स्तरावर व महिला तक्रार निवारण कक्षामध्ये सुद्धा आता सेवा प्रणालीचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे आता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस चौकी व महिला तक्रार निवारण कक्षामध्ये येणाऱ्या तक्रारदारांच्या नोंदी सेवा प्रणालीमध्ये घेण्यात येणार असून तक्रारदारांचे अभिप्राय नोंदविणे शक्य होणार आहे. यापूर्वीच पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटिंग हॉलमध्ये ०३ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, १० दूरक्षेत्र (चौकी) स्तरावरील तसेच महिला तक्रार निवारण कक्ष येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सेवा प्रणालीबाबत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण सत्रामध्ये पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी बहुमुल्य मार्गदर्शन करून काही ठिकाणी पोलीस चौकीच्या कामकाजामध्ये सुधारणा करणेबाबत सूचित केले होते. अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (IPS) यांच्याहस्ते ०३ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, १० दूरक्षेत्र (चौकी) स्तरावर व महिला तक्रार निवारण कक्ष येथील अंमलदारांना टॅबचे वितरण करण्यात आले होते. जिल्ह्यात सेवा प्रणाली सुरु झाल्यापासून आतापर्यंत पोलीस पडताळणी ३५७, एन.सी. प्रकरणे २१०४ तक्रार अर्ज ७५०, पासपोर्ट पडताळणी २२४ व इतर असे मिळून एकूण ८४०४ अभ्यागतांच्या नोंदी प्रणालीवर नोंदविण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ९३.७१% प्रमाणात तक्रारदारांचे समाधान झालेले आहे.

सदर सेवा प्रणालीचे कामकाज पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे (IPS), पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, महिला पोलीस अंमलदार वर्षा बांगर, पुष्पा मनवर, कोमल गाडे यांचे पथकाने मोलाची कामगिरी बजावली आहे. नागरिकांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण करत त्यांचे संपूर्ण समाधान करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव प्रयत्नशील असून सेवा प्रणालीद्वारे जनसेवेचे हे ध्येय साध्य होतांना दिसत आहे. सेवा प्रणाली अंतर्गत आणखी काही सुधारणा हव्या असतील तर संबंधित पोलीस अंमलदार किंवा प्रभारी अधिकारी यांना माहिती देऊ शकता, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments