वाशिम - शहरातील विविध विकासकामात होत असलेला भ्रष्टाचार व रखडलेल्या कामांमुळे शहराची दैना झाली असून यासाठी मुख्याधिकारी दिपक मोरे हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांची त्वरीत बदली करुन त्यांच्याजागी नव्या मुख्याधिकार्याची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी आ. लखन मलीक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाने १२ डिसेंबर रोजी निर्गमित केलेल्या एका शासन परिपत्रकाव्दारे मुख्याधिकारी मोरे यांची बदली करण्यात आली असून त्याजागी श्रीकृष्ण वाहुरवाघ हे नवे मुख्याधिकारी म्हणून वाशिम नगर परिषदमध्ये रुजु झाले आहेत.
यासंदर्भात आ. लखन मलीक यांनी २० नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले होते. शहरातील विविध विकास कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत मुख्याधिकारी दिपक मोरे यांना तात्काळ निलंबित करुन व त्यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आ. मलीक यांनी केली होती. मुख्याधिकारी दिपक मोरे यांच्यावर कन्नड न.प. मध्ये कार्यरत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यवाही झाली होती. तसेच वाशिम न.प. मध्ये त्यांनी आर्थिक भ्रष्टाचार व अनियमितता केल्याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे कारवाईसाठी पाठविला होता. यासह शहरातील निकृष्ट रस्ते, टेम्पल गार्डन, नाट्यगृह अशा प्रकारच्या अनेक कामांमध्ये त्यांनी करोडो रुपयाचा भ्रष्ट्राचार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची कार्यालयीन चौकशी सुरु आहे. त्यामुळे दिपक मोरे यांना तात्काळ निलंबित करुन त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आ. लखन मलीक यांनी मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून मुख्याधिकारी मोरे यांच्या बदलीनंतर श्रीकृष्ण वाहूरवाघ हे वाशिम नगर परिषदेमध्ये रुजु झाले आहेत. त्यामुळे शहरातील प्रलंबित व रखडलेली विकासकामे वेगाने पुर्ण होतील व वाशिमकर जनतेला दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करतांना यासाठी सहकार्य करणार्या वाशिमकर जनतेचे आ. लखन मलीक यांनी आभार मानले आहेत. यावेळी स्थानिक विश्रामगृहात १३ डिसेंबरला झालेल्या सत्कार कार्यक्रमात आ. लखन मलीक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, निलेश जैस्वाल, शिवशंकर भोयर, अनिल कुलकर्णी आदींनी मुख्याधिकारी श्रीकृष्ण मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहूरवाघ यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
0 Comments