Ticker

6/recent/ticker-posts

कृषिधन कंपनीच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान७१ हजार रुपये नुकसान भरपाईचे न्यायालयाचे आदेश

वाशिम - कृषिधन कंपनीचे बोगस सोयाबीन बियाणे पेरल्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसान प्रकरणी वि. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाखल प्रकरणामध्ये वि. न्यायालयाने शेतकर्‍याच्या बाजुने निकाल देवून झालेल्या आर्थिक़ नुकसानीपोटी शेतकर्‍याला बियाणे व मशागत खर्च मिळून ५६ हजार व तक्रार खर्च १५ हजार असे एकूण ७१ रुपये देण्याचे कृषिधन कंपनी व संबंधीत कृषी सेवा केंद्राला आदेशित केले आहे. यामुळे शेतकर्‍याला न्याय मिळाला असून बोगस बियाणे विक्रीप्रकरणी कृषी सेवा केंद्राचे धाबे दणाणले आहेत.
  याबाबत अधिक माहिती अशी की, कारंजा लाड तालुक्यातील मौजे दुघोरा येथील शेतकरी अमोल रामराव बांडे यांनी सन २०२१ च्या खरीप हंगामात शेतात सोयाबीन पेरणीकरिता कृषिधन कंपनीचे सोयाबीन जे.एस.३३५ वाण बियाणे कारंजा येथील पुष्पार्पण कृषी सेवा केंद्रातुन खरेदी केले होते. हे बियाणे शेतकर्‍याने शेतात पेरणी केल्यानंतर सोयाबीन पिकाचे झाडे अतीजास्त प्रमाणात वाढली व त्याला फुले व शेंगा लागली नाहीत. त्यामुळे शेतकरी बांडे यांनी तालुका तक्रार निवारण समिती कारंजा येथे धाव घेवून रितसर तक्रार दाखल केली. या तक्रारीवर कार्यवाही करतांना तालुका तक्रार निवारण समिती कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ अकोला यांच्या कृषी शास्त्रज्ञांनी पेरणी केलेल्या शेताच्या पाहणीनंतर कृषिधन कंपनीचे सोयाबीन जे.एस.३३५ वाण बियाणे भेसळयुक्त असल्याचेा अहवाल दिला. त्यानंतर शेतकरी अमोल बांडे यांनी बोगस बियाण्यामुळे सोयाबीनच्या उद्प्पन्नात घट झाली असून आपले आर्थिक नुकसान झाले आहे. या फसवणूकीविरुध्द त्यांनी कृषिधन कंपनी व पुष्पार्पण कृषी सेवा केंद्र यांचेविरुद्ध वि.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाशिम यांचेकडे न्याय मिळणेकरिता २१ ऑक्टोंबर २०२१ प्रकरण दाखल केले. या प्रकरणावर सुनावणी करतांना वि.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने भेसळयुक्त बियाण्यांचा कृषी समितीचा अहवाल ग्राह्य धरुन व प्रकरणातील खरी परिस्थिती लक्षात घेतली आणि तक्रारकर्त्याच्या तक्रार अर्ज मंजूर करून बियाणे उत्पादक कृषिधन कंपनी व पुष्पार्पण कृषी सेवा केंद्र यांनी बियाणे खर्च व मशागत खर्च रक्कम ५६ हजार रुपये तक्रारकर्त्याला देण्यासह सदर रक्कम तक्रार दाखल झाल्या पासुन ९% द.सा.द.शे व्याज दराने तक्रारकर्त्याला देणे बाबत आदेशित केले आहे. तसेच तक्रारकर्त्याला तक्रार खर्च रक्कम व नुकसान भरपाई रक्कम १५ हजार रुपये देण्याबाबतचा आदेश २१ डिसेंबर २०२२ रोजी वि.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री.आनंद बि.जोशी, मा.सदस्य श्रीमती डोल्हारकर व मा.सदस्य मुजावर यांनी दिला. तक्रारकर्त्याच्या वतीने अँड.सर्वजीत. ए.गोरे वाशिम यांनी काम पाहीले.

Post a Comment

0 Comments