Ticker

6/recent/ticker-posts

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा.


संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु व जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे यांचे आवाहन

मंगरुळपीर 
: राष्ट्रमाता, राजमाता माँ साहेब जिजाऊ यांची १२ जानेवारी रोजी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ व ३२ कक्षाच्या वतीने 'जिजाऊसृष्टी' सिंदखेडराजा येथे ४२५ वा जन्मोत्सव सोहळा भव्य स्वरुपात साजरा होणार आहे.

या सोहळ्याला दरवर्षी हजारो शिवभक्त मॉं साहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथे मोठी गर्दी करत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांत राज्यासह देशावर कोरोनाचे सावट होते, त्यामुळे दोन वर्ष जिजाऊ जन्मोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता, परंतु यावर्षी १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा 'जिजाऊसृष्टी' सिंदखेडराजा येथे भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. या दिवशी 'जिजाऊसृष्टी' वर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे.

तरी मंगरुळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील तमाम जनतेने या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे व मंगरुळपीर तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments