Ticker

6/recent/ticker-posts

वनोजात रोखला नियोजित बालविवाह


        वाशिम ,  : जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वनोजा येथे २ मे रोजी होणारा नियोजित बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनला यश आले. वनोजा येथील अल्पवयीन १६ वर्षाच्या बालिकेचा बालविवाह जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या सतर्कतेने रोखण्यात आला.


 बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड लाईन यांच्याकडून जिल्हा बाल संरक्षण कक्ष वाशिमला मिळताच कक्षाच्या बाल संरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे, क्षेत्रीय कार्यकर्ता रामेश्वर वाळले, चाईल्ड लाईनचे समन्वयक शाहीद खान, सदस्य गोपाल आरु व अविनाश सोनुने यांच्याशी संपर्क साधून नियोजित बालविवाह रोखण्याची कार्यवाही करण्यात आली.

           या पथकाने रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्सटेबल श्री. पठाण, ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी श्री. शिंदे, गाव बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष तथा सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर  व ग्राम बाल संरक्षण समितीच्या मदतीने अल्पवयीन बालिकेच्या वडिलांसह कुटुंबीयांचे समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत हमीपत्र लिहून घेण्यात आले. यापुढे अशाप्रकारचा कोणताही बालविवाह जिल्ह्यात होत असल्याचे लक्षात आल्यास चाईल्ड लाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments