Ticker

6/recent/ticker-posts

बच्चू कडू यांची मोठी घोषणा; म्हणाले, “मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा माझा निर्णय…!”


अपक्ष आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून मंत्रीपदामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. यासंदर्भात खुद्द बच्चू कडू यांनीही अनेकदा सूचक विधानं करून चर्चेची राळ उडवून दिली होती. आज सकाळीही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपण ११ वाजता निर्णय जाहीर करणार असं म्हटलं होतं. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. यावेळी गेल्या अर्ध्या तासात मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारंवार फोन आल्याचंही सांगितलं.

“…तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती”

यावेळी बोलताना बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करताना घडलेल्या घडामोडी सांगितल्या. “मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंकडे आम्ही दोन आमदार गेलो. त्यांनी आमच्याकडे स्वत: फोन करून पाठिंबा मागितला. त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला. त्यानंतर बऱ्याचदा इतर पक्षांकडून आम्हाला आमिषं आली. पण आम्ही आमच्या पाठिंब्यावर ठाम राहिलो. तसेच, उद्धव ठाकरेही दिलेल्या शब्दावर ठाम राहिले आणि मी राज्यमंत्री झालो”, असं ते म्हणाले.

“पण त्यानंतर राज्यात नवीन सत्तासमीकरणं जुळायला लागली. आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयासाठी भेटत होतो. तेव्हा दिव्यांग मंत्रालय झालं असतं, तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती. पण एकनाथ शिंदेंनी दिव्यांग मंत्रालय तयार केलं. माझ्यासाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी घटना आहे. मी गुवाहाटीला जाण्यामुळे या देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय अस्तित्वात आलं. त्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर आयुष्यभर एकनाथ शिंदेंचे आभार मानत राहीन”, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

“आम्हाला बदलत्या राजकारणाचा कंटाळा आलाय”

दरम्यान, यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरील आपली नाराजी बोलून दाखवली. “एकंदरीत सत्ता, पैसा आणि पुन्हा सत्ता या बदलत्या राजकारणाचा आम्हाला कंटाळा आला आहे. सगळं काही पदासाठी नसतं. काही लोक म्हणतात की तुम्हाला आता पद मिळणार नाही वगैरे. मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. आम्ही इथून पुढे दिव्यांगांसाठी, शहीद परिवारांसाठी काम करणार आहे”, अशी भूमिका बच्चू कडूंनी यावेळी मांडली.

Post a Comment

0 Comments