दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी, साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे महागाई वाढून त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. अश्याप्रकारचा जीवनावश्यक वस्तूंचा गैरप्रकार तसेच काळाबाजार रोखण्यासाठी साठेबाजी/काळाबाजारी करणाऱ्यांविरोधात मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ नुसार कारवाया करण्यात येत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते व पथकास पेट्रोलिंग करत असतांना पो.स्टे.वाशिम शहर हद्दीतील सुफी नगर, ईदगाह रोड, वाशिम येथे वाहनातून एक इसम जीवनावश्यक धान्य राशनच्या तांदुळाची अवैधपणे वाहतूक करून काळाबाजारी करत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्याअनुषंगाने परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते यांनी पथकासह तेथे जाऊन पंचासमक्ष एका पिवळ्या रंगाच्या अॅपे वाहन क्र. MH-37-B-983 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये राशनचे तांदूळ असलेले १९ पोते (९.९६ क्विंटल) अं.किं.२१,३१८/-रु. आढळून आले. सदर प्रकरणी मोहम्मद सोहेल शेख शेख हसन याचेवर दि.०६.०९.२०२३ रोजी पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.७२६/२३, कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचे ताब्यातून अं.किं.२१,३१८/-रु.चे राशनचा तांदूळ व पिवळ्या रंगाच्या अॅपे वाहन क्र. MH-37-B-983 अं.किं.१,२५,०००/-रु. असा एकूण १,४६,३१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशाप्रकारे वर्षभरात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अन्वये अवैधपणे विनापरवाना धान्यसाठा केल्याचे १५ गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यामध्ये एकूण १२,१७,४७९/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते यांच्या नैतृत्वाखाली पो.स्टे.वाशिम शहरच्या पथकाने पार पाडली. जीवनावश्यक वस्तूंचा गैरप्रकार करत साठेबाजी व काळाबाजार करून नागरिकांच्या सोयीसुविधांमध्ये बाधा निर्माण करू पाहणाऱ्या साठेबाजांवर वाशिम पोलीस दल लक्ष ठेवून आहे. नागरिकांनीही त्यांना आढळलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या गैरप्रकाराबाबत वाशिम जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास (संपर्क क्र. ०७२५२-२३४८२४), DIAL 112 किंवा संबंधित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
0 Comments