दि.१५.१०.२०२३ ते दि.२४.१०.२०२३ दरम्यान जिल्हाभरात दुर्गोत्सव साजरा केला जाणार असून जिल्ह्यात सर्वत्र अंदाजे ५२१ नवदुर्गांची स्थापना होणार आहे. सदर कालावधीत महिलांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज आहे.
त्यानुषंगाने वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून पोलीस स्टेशन स्तरावर शांतता समितीच्या बैठका घेत नागरिकांना शांततेत नवदुर्गोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुर्गोत्सव दरम्यान सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता पो.स्टे.स्तरावर रूट मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. वाशिम जिल्हा पोलीस दलाचे वतीने ०१ पोलीस अधीक्षक, ०१ अपर पोलीस अधीक्षक, ०४ पोलीस उपअधीक्षक, १७ पोलीस निरीक्षक, ५५ सहा.पोलीस निरीक्षक, ०२ RCP पथक, ५०० पेक्षा जास्त होमगार्ड, ०२ स्ट्रायकिंग फोर्स, ०१ SRPF कंपनी इतका बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
गरबास्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथकासह विशेष पथक तैनात करण्यात आले असून साध्या कपड्यांमध्ये पुरुष व महिला अंमलदार हे तैनातीस राहणार असून छेडखानी, चोरी, पाकीटमारीसारख्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेऱ्यांसह पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. गरबा कार्यक्रमस्थळी CCTV द्वारे निगराणी केली जाणार असून सर्व दुर्गा मंडळांना QR Code लावून त्यांना वेळोवेळी निर्भया पथक व DIAL 112 स्टाफच्या माध्यमातून स्कॅन केले जाणार आहे.
ध्वनी पातळीच्या मर्यादेबाबत ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) २००० मधील तरतुदींचे आणि मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, नवदुर्गा मंडळांनी सणाचे पावित्र्य राखून सामाजिक एकोपा टिकून राहावा यादृष्टीने नियमांचे काटेकोर पालन करून दुर्गोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
(जनसंपर्क अधिकारी)
पोलीस अधिक्षक कार्यालय, वाशिम
0 Comments