[ श्रींच्या पुण्यतिथी औचित्याने लिफ्ट भक्तार्पण सोहळा ]
[ दीपोत्सव, महाआरती, महाप्रसादासह विविध कार्यक्रम ]
अकोला...............,....,......
वारकरी संप्रदायात स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराजांनी महान कार्य केले आहे. त्यांना अभिप्रेत असणारे कार्य संत वासुदेव महाराजांनी पुढे चालविले. सद्गुरु जोग महाराजांप्रमाणेच त्यांनी आपले निर्याणसुद्धा श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये साधले असून इतिहासाची पुनरावृत्ती घडली. आज त्यांच्या कार्याचा वसा घेऊन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था आपली वाटचाल करत आहे, याचा मनस्वी अभिमान वाटतो असे प्रतिपादन गुरुवर्य शांतीब्रह्म श्री.ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर यांनी केले. श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट द्वारा निर्मित भव्य श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळेतील वारक-यांच्या सोयीसाठी लिफ्टच्या भक्तार्पण सोहळ्यात ते आशीर्वादपर बोलत होते.
आषाढ शुद्ध दशमी या श्री संत वासुदेव महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या औचित्याने संपन्न झालेल्या लिफ्ट भक्तार्पण सोहळ्यात मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना, अवस्था प्राप्त करण्यासाठी श्री संस्थेद्वारा विविध प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. या सर्व व्यवस्थेचा वारकऱ्यांनी जाणीवपूर्वक लाभ घेऊन आपली परमार्थिक उन्नती साधावी. संत वासुदेव महाराज यांच्या कार्याचा जागर, वसा आणि वारसा अखंड ठेवावा. अल्पावधीत संस्थेची भरभराट व उत्कर्षाची वाटचाल अभिनंदनीय असून त्याकरिता भगवान श्री पंढरीनाथ व सर्व संतांचे आशीर्वाद लाभावे, असे भावपूर्ण उद्गार व्यक्त केले. प्रस्तुत कार्यक्रमाकरिता सर्व श्री.ह.भ.प. संदिपान महाराज शिंदे, प्रकाश महाराज जवंजाळ, रामेश्वर महाराज शास्त्री, संजय महाराज पाचपोर, दादाराव महाराज तायडे, जगन्नाथ महाराज पाटील, ज्ञानेशप्रसाद महाराज पाटील, सदानंद महाराज गावंडे, प्रशांत महाराज ताकोते, सिताराम महाराज, अशोकराव उन्हाळे, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी श्री संत भास्कर महाराज यांचे पासून सद्गुरू जोग महाराज, मारोती महाराज गुरव, मामासाहेब दांडेकर, वारकरी शिक्षण संस्था व श्री संत वासुदेव महाराज यांचा असलेला पूर्वापार संबंध, आजही दोन्ही संस्थांचे स्नेहअनुबंध या सर्वांना कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांनी उजाळा दिला.
सर्वप्रथम टाळ मृदंगाच्या गजरात मान्यवरांचे धर्मशाळेत पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. वारकरी वैष्णवांच्या सुविधेसाठी वै. जयवंत सुरेंद्र चिकटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री सुरेंद्र चिकटे व सौ लताताई चिकटे यांच्या भरीव आर्थिक योगदानातून लाभलेल्या लिफ्टचे पूजन करून व फीत कापून उद्घाटन गुरुवर्य मारोती महाराज कुरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या लिफ्टमध्ये सर्वात प्रथम श्री संत वासुदेव महाराज यांच्या चरण पादुका, मुखवटा मारोती महाराज कुरेकर व संदीपान महाराज शिंदे यांच्या शुभहस्ते लिफ्टद्वारा वरच्या माळ्यावर नेण्यात आला. याप्रसंगी सर्वांनी जयघोष करून आनंद उत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप सोनखासकर, सूत्रसंचालन अंबादास महाराज मानकर, उमेश महाराज मोहोकार, आभार प्रदर्शन प्रशांत महाराज ताकोते यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान राज्यस्तरीय निलरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वासुदेवराव महाराज महल्ले व ज्ञानेशप्रसाद महाराज पाटील यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार संपन्न झाला. ६०० कि.मी. प्रवास करणारे दिव्यांग वारकरी श्री रविंद्र बोचे यांना दिव्यांग लाकडी यंत्र व शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाकरिता विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष महादेवराव ठाकरे, सचिव रवींद्र वानखडे, सहसचिव अवि गावंडे, विश्वस्त सुनंदाताई आमले, अशोकराव पाचडे, जयदीप सोनखासकर, अनिल कोरपे, केशवप्रसाद राठी, गजाननराव दुधाट, पुरुषोत्तम मोहोकार, व्यवस्थापक अमोल मानकर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य केले या कार्यक्रमाला असंख्य भाविक भक्तांची उपस्थिती होती.
*विविध कार्यक्रमांनी श्रींचा पुण्यतिथी उत्सव संपन्न*
श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आषाढ शुद्ध दशमी या दिवशी पहाटे चार वाजता नगरप्रदक्षिणेद्वारा श्रींचा रथ, दिंडी वारकऱ्यांसह चंद्रभागा वाळवंटामधील श्रींच्या अग्निसंस्कार स्थळी श्रींना अभिषेक व आरती करून या ठिकाणी वासुदेवराव महाराज महल्ले यांचे पुण्यतिथी उत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. येथे गरजू व अनाश्रीत वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. तद्नंतर लिफ्टचा भक्तार्पण सोहळा, महाप्रसाद, प्रवचन, कीर्तन, रात्री समयी वारकरी सांप्रदायिक भजनानंदात दीपोत्सव साजरा करण्यात आला. रात्री पावणेदहा या श्रींच्या देह-विसर्जन समयाला पुष्पवृष्टी होऊन महाआरती संपन्न झाली. पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, आदी भरगच्च कार्यक्रमा सह अखंड अन्नदान सत्र सप्ताहात पार पडले. अशी माहिती वारीतील वारकरी समाजसेवक गजानन हरणे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवली आहे.
0 Comments