पिंप्री अवगण : येथील परमहंस झोलेबाबा विद्यालय तथा स्व. मधुकरराव ल. सपकाळ कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध उपक्रम, प्रभातफेरी, देशभक्तिपर गीत आणि विद्यार्थ्यांच्या प्रभावी भाषणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा प्राचार्य श्री. सुनील सपकाळ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. किशोर लांभाडे यांनी केले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. दिलीप अवगण, प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त माजी शिक्षक श्री. पडघान, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गावातून उत्साहात प्रभातफेरी काढली. श्री. किशोर लांभाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या स्काऊट-गाईडच्या विशेष उपक्रमामुळे प्रभातफेरीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले. स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध सहभाग, आकर्षक संचलन आणि देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण करून देणारी विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला देशभक्तीची ऊर्जा मिळाली. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य जपण्यासोबतच देशाच्या विकासात युवकांनी सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. चेतन वानखडे यांनी आभार मानले. आनंदी, उत्साहपूर्ण आणि देशभक्तिमय वातावरणात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा दिमाखात संपन्न झाला.
0 Comments