Ticker

6/recent/ticker-posts

सापांविषयी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात ‘सर्व शिक्षा अभियान’ विषयावर व्याख्यान; ९०० विद्यार्थ्यांचा सहभाग

मंगरूळपीर | सुधाकर चौधरी 


यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुल, मंगरूळपीर आणि निसर्ग फाउंडेशन, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी ‘सर्व शिक्षा अभियान’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनय कुलकर्णी जाधव तसेच नरवाडे उपस्थित होते.

यावेळी विनय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना परिसरात आढळणाऱ्या विषारी, निमविषारी आणि बिनविषारी सापांची ओळख कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच सापांविषयी समाजामध्ये प्रचलित असलेल्या विविध अंधश्रद्धा, गैरसमज आणि चुकीच्या समजुती दूर करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.

साप दिसल्यानंतर घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेणे, सापांची अनावश्यक हत्या न करणे तसेच साप आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

या व्याख्यानाचा लाभ यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम हायस्कूल तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सापांविषयी विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या व्याख्यानाचा उपक्रम उपयुक्त ठरला.



Post a Comment

0 Comments