सांगो जाणती शकुन|भूत भविष्य वर्तमान||१||
त्यांचा आम्हासी कंटाळा| पाहो नावडती डोळां||२||
रिद्धीसिद्धींचे साधक| वाचासिद्ध होती एक||३||
तुका म्हणे जाती| पुण्यक्षयें अधोगती||४||
आपल्याला शकून -अपशकुनांची फळं कळतात, आपण अंतर्ज्ञानानं, भूत ,भविष्य वर्तमान अशा तिन्ही काळांतील घटना सांगू शकतो ,असे काही लोक म्हणत असतात .ज्योतिषी, मांत्रिक वगैरे लोकांचा यांच्यामध्ये अंतर्भाव होतो .परंतु या लोकांकडं प्रत्यक्षात असं कोणतंही सामर्थ्य नसतं ,हे संत तुकोबाराय नि:संदीग्धपणे जाणत होते. म्हणूनच आपल्याला असं वाटणाऱ्यांचा कंटाळा आहे. आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहणं देखील आपल्याला आवडत नाही, असं संत तुकोबाराय अगदी ठणकावून सांगतात.
आपल्याला रिद्धीसिद्धी नावाच्या अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या आहेत, असं काही जण सांगतात. काहीजण आपण वाचासिद्ध आहोत, असं म्हणतात .म्हणजेच आपण जे जे बोलतो, ते ते घडतं, असं ते भासवतात .अशा प्रकारचे लोक पुण्याचा क्षय होऊन अधोगतीला जातात, असं संत तुकोबाराय म्हणतात .याचा अर्थ ,लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांनी पूर्वी जरी काही सत्कर्म केलेली असली, तरी तीही वाया जातात .जे निष्पाप लोकांची वंचना करतात, त्यांचा स्वतःचाही अध:पात होतो, मग ते इतरांचं कल्याण करतील ही शक्यताच नाही .म्हणून, लोकांनी त्यांच्यापासून सावध राहावं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये वा विसंबून राहू नये, असं संत तुकोबाराय सुचवत आहेत.
संत तुकोबारायांनी शुभ आणि अशुभ याच्या संदर्भात अतिशय आश्वासक संदेश दिला आहे .एवढ्या महान संतांनी दिलेला हा संदेश आपण ध्यानात घेतला नाही ,तर आपल्यासारखे करंटे आपणच, असं म्हणावं लागेल.
धर्माच्या नावाखाली माणसं नागवली जात होती. धर्माभिमान्यांकडून जनतेला कर्मकांड ,व्रतवैकल्ये व अंधश्रद्धेच्या खाईत लोटले जात होते .त्यामुळे माणसे अडाणीच राहत होती .माणसाचे ठाई ठाई मानहानी होती. ढोंगी आणि पाखंडी कथा, पुराण ,निरक्षर लोकांच्या गळी उतरवून त्यांना अज्ञानी बनवले जात होते. त्यामुळे निराशेच्या गर्देत माणसे आणि माणुसकी भरडली जात होती.
, एकच गोष्ट हजार वेळा अज्ञानी लोकांच्या कानावर आदळली किती गोष्ट त्या अज्ञानांना खरी वाटते .आणि मग खोट्याचेच पेव फुटते. आणि कालांतराने समाज रसातळाला जातो. हे संत तुकोबारायांना माहीत होते ,म्हणून त्यांनी काही वेळेला काही गोष्टी ठणकावून सांगितल्या आहेत.
धर्माच्या नावाखाली सामाजिक ,आर्थिक आणि धार्मिक दृष्ट्या ,जो पूजेच्या नावाखाली समाजाचे मानसिक स्वास्थ्य बिघडवून त्यांना कर्मकांडाच्या मागे लावतो, तो निश्चित पापी असतो. अशी संत तुकोबारायांची खात्री आहे. या विषयाचा संत तुकोबाराय तिरस्कार करतात.
शिवश्री विजय गुरुजी
येवतीकर 8605504866
( शिवव्याख्याते, किर्तनकार, प्रवचनकार, योगशिक्षक ) गाथा प्रचारक,सदस्य गाथा परिवार ,साभार अभंगशतक
जय जगद्गुरू पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
0 Comments